कोल्हापूर : शहरात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत लक्ष्मीपुरीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होते. लक्ष्मीपुरीतील कामगार चाळ, महावीर कॉलेज परिसरात अंतरंग सोसायटी तसेच नवीन राजवाडा गेट जवळील सन सिटी, विंड गेट्स, रॉयल अस्टोनिया, तारांगण या सर्व सोसायटी मधील लोकांसाठी मदत कार्य सुरू होते. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना धीर देऊन सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. या वेळी आजरेकर फाउंडेशनचे अश्किन आजरेकर, आशपाक आजरेकर व कोल्हापूर महानगर पालिका अग्निशमन दलाचे जवान यांनी परिश्रम घेतले. पावसाचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता, अश्या कठीण परिस्थितीत कोणाला कसलीही मदत लागत असेल तर त्वरित संपर्क करावा, असे आवाहन आजरेकर यांनी केले आहे.
लक्ष्मीपुरीतील कामगार चाळीत रेस्क्यू ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:21 AM