संदीप बावचे
शिरोळ : शिरोळ तालुक्यात बचावकार्य थांबविण्यात आले आहे. तालुक्यात महापुराचे चित्र अजूनही कायम आहे. सोमवारी दिवसभरामध्ये अंकली येथे कृष्णेची पातळी एक फुटाने कमी झाल्याने शिरोळकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पूर ओसरल्यानंतर नियोजनाची तयारी आपत्ती व्यवस्थापनाकडून सुरू झाली आहे. त्यासाठी गावनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवार (दि.२३) पासून शिरोळ तालुक्यात कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. बघता बघता महापूर आला. खबरदारी म्हणून प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनीही प्रतिसाद दिला. तीन दिवसांत जवळपास ७६ हजार पूरग्रस्त स्थलांतरित झाले. पशुधनालाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. दरम्यान, सोमवारी दोन-चार गावातील अपवाद वगळता बचावकार्य मोहीम थांबवून संपर्क तुटलेल्या गावात जीवनावश्यक वस्तू व औषधे बोटीच्या माध्यमातून पाठवून मदतीचा ओघ सुरू आहे. छावणीमध्ये वैद्यकीय पथकामर्फत सेवा दिली जात आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावर उदगाव येथे कृष्णा नदीच्या पुराचे पाणी अद्याप कायम आहे. सोमवारी सायंकाळी अंकली पुलाजवळ पाणी पातळी ५७.०३ फूट होती. तर राजापूर बंधारा व कुरूंदवाड पुलाजवळ नदीची पातळी स्थिर होती.
माणुसकीचे चित्र
शिरोळ तालुक्यात ४४ पूरग्रस्त छावण्या असून दत्त, गुरुदत्त कारखाना, शरद कृषी महाविद्यालय, राजेंद्र पाटील-यड्रावकर फौंडेशन, भाजप युवा मोर्चा, वाघजाई ग्रुप, शिरोळ, जयसिंगपूर, कुरूंदवाड नगरपालिका यासह सेवाभावी संस्था, शिक्षक संघटना, राजकीय पक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना चहा, नाष्टा, जेवण दिले जात आहे. छावणीमध्ये जवळपास १५ हजार पूरग्रस्त आहेत. तर उर्वरित पूरग्रस्त पै-पाहुणे, नातेवाइकांकडे गेले आहेत.
...........
शिरोळकडून शेजारधर्म
शिरोळ शहराकडून शेजारधर्म पाळला जात आहे. नांदणी येथे पूरग्रस्तांच्या जनावरांची वैरणीअभावी बिकट अवस्था झाल्याचे समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटना व सागर संभूशेटे यांच्या पुढाकाराने जयसिंगपूरचे उद्योजक संदीप चकोते यांच्याकडून १५० जनावरांना कडबाकुट्टीचे वाटप करण्यात आले.
फोटो ओळ :२६ शिरोळ भोजन
शिरोळ निवारा केंद्रात सोमवारी इचलकरंजी येथील श्रीराम ग्रुपच्यावतीने पूरग्रस्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.