कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिराचे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले फायर ऑडिट सोमवारी पूर्ण करण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांनी केलेल्या पाहणीत एखाद्यावेळी मंदिर परिसरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याच्यापासून बचावाची कोणतीही यंत्रणा मंदिर प्रशासनाने सज्ज ठेवलेली नसल्याची गंभीर बाब या ऑडिटमधून समोर आली.अग्निशमन विभाग व देवस्थानचे कर्मचारी यांनी सोमवारी एकत्रितपणे फायर ऑडिटच्या अनुषंगाने अंबाबाई मंदिर परिसराची पाहणी केली. त्यावेळी बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. एखादी मोठी घटना घडली तर त्यापासून बचाव करणारी कोणतीही यंत्रणा त्याठिकाणी उपलब्ध नाही. अग्निशमन दलाची वाहने मंदिर परिसरात येईपर्यंत प्रारंभिक बचावाची साधनेही तेथे नसल्याचे आढळून आले. मंदिर परिसरात अग्निशमन दलाकडे असलेली वाहने, रुग्णवाहिका आत जाऊ शकत नाही, अनेक अडथळे आतमध्ये असल्याचे दिसून आले.
वायरिंग अतिशय जुनाट, गुंतागुंतीचेमंदिर परिसरात फायर इन्स्टिग्युशन, पाण्याची टाकी, मंदिर परिसरातील तटबंदीवर प्रत्येक पंधरा मीटर अंतरावर होजरिल सिस्टीम, प्रेशर पंप बसवावी लागणार आहेत. इलेक्ट्रीक वायरिंग अतिशय जुनाट व गुंतागुंतीचे असल्याचे त्याचेही एकदा ऑडिट करून घ्यावे लागणार आहे. प्रत्यक्ष पाहणीवेळी या गोष्टींची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.
गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार?नवरात्रोत्सवात मंदिर आवारात मोठी गर्दी असते, विशेषत: मुखदर्शन व पालखीवेळी चेंगराचेंगरीचे प्रकार घडत असतात. त्यावर कसे नियंत्रण मिळवायचे या अनुषंगानेही सोमवारी पाहणी झाली. पालखी मिरवणूक तसेच मुखदर्शनाच्या गर्दीवर उपाययोजना करण्याची गरज पाहणीतून पुढे आली. ज्या पद्धतीने गाभाऱ्यापर्यंत जाणाऱ्या भाविकांची रांगेची व्यवस्था करण्यात येते तशाच पद्धतीने मंदिर परिसराच्या बाहेरूनच स्वतंत्र रांग मुखदर्शनासाठी करावी लागणार आहे, ज्यामुळे भाविक मंदिर आवारात विनाकारण रेंगाळणार नाही.