नितीन भगवान।पन्हाळा : कोल्हापूर जिल्ह्यातील जैवविविधतेने नटलेल्या पन्हाळा जंगल क्षेत्र परिसरात फुलपाखरांचा हंगाम सुरू झाला आहे. या परिसरात फुलपाखरांच्या अनेक दुर्मीळ जाती पाहावयास मिळत असल्याची माहिती फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले व रवींद्र अष्टेकर यांनी दिली.
पन्हाळा परिसर आणि पावनगड या ठिकाणी दिसणाऱ्या फुलपाखरांच्या जाती अशा आहेत - स्वॅलोटेल (पॅपिलिअनेडी), ब्रश फुटेड (निम्फा लीडस), ब्लू समुद (लायसिनिडूस), स्किपर (हेस्पेरिडी) व पिवळ्या आणि पांढºया रंगांचे (पिरिडस) अशा फुलपाखरांच्या प्रमुख पाच समूहांतील तब्बल २०० जातींची फुलपाखरे असल्याचे स्पष्ट होत असल्याची माहिती ओगले व अष्टेकर यांनी दिली. यापूर्वी पन्हाळा वन परिसरात विविध जातींची १३० फुलपाखरे अस्तित्वात होती व आहेत. या फुलपाखरांमध्ये एन्डेमिक (प्रदेशनिष्ठ) अशा दुर्मीळ जातींचा समावेश आहे. त्यातील काही फुलपाखरे १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत येतात. तसेच व्हाइट बँडेड आॅल, तमिळ स्पॉटेड प्लॅट, ब्लँक स्विफ्ट, ट्री फ्लिट्टर, कून, प्रिम्मी स्क्रब हूपर, मलबार बँडेर्ड पिकोर्क कुझर, मलबार रेव्हन पॅरिस पिकोर्क, स्पॉट सॉडर्टेल, कॉमन इम्पेरियल, डाक प्रियरोट, प्लेन टिनसेल, ब्राऊन किंग को, ग्रेट इव्हिनिंग ब्राऊन, कलर सार्जट, बँडेड रॉयल, आॅटम लिक, अशा विविध जातींची फुलपाखरे यावर्षी नव्याने दिसू लागली आहेत. यातील सदर्न बर्ड विंग फुलपाखराच्या पंखांचा आकार तर १९० मि.मी. (२५ सें.मी.) असल्याचे दिसून आले. याबाबत पन्हाळा वन विभाग अनभिज्ञ आहे. पन्हाळा वन विभागाने फुलपाखरांसाठी राखीव जंगल क्षेत्र करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ब्ल्यू मॉर्मन (नीलवंत) : या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतातील वनांत आणि श्रीलंका या ठिकाणी आढळते. त्याचा पंखविस्तार १५० मि.मी. असतो. शरीर आणि पंख काळे असून, दोन्ही पंखांवर निळे ठिपके असतात. मागच्या पंखांच्या खालील बाजूस शरीराकडील टोकावर लाल ठिपका असतो. काळ्या पंखावरची निळी तकाकी दिसून येते. २०१५ मध्ये या फुलपाखराला ‘महाराष्ट्र राज्य फुलपाखरू’ असा दर्जा दिला आहे.
पन्हाळा परिसरात फुलपाखरांच्या २४0 पेक्षा अधिक जातीराज्यातील सर्वांत जास्त विविध प्रकारच्या फुलपाखरांसाठी पन्हाळा परिसर प्रसिद्ध होत आहे. साधारण २४० च्या आसपास विविध जाती या परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे फुलपाखरांच्या संवर्धनासाठी त्यांच्या अन्य वनस्पतींचेही जतन करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांना वाघ्या, बिबळ्या कडवा, ढाण्या कडवा, काळू, पानपंखी, शुभ्रपंखी, सोनपंखी, नीलवंत, भिरभिरी, नखरेल मयूरी, भटके तांडेल, सरदार, नीलपरी, चित्ता, एरंड्या, छोटा चांदवा, काळा राजा, तपकिºया, चिमी, निलपºया भीमपंखी, लिंबाळी, बहुरूपी, शेंदूर टोक्या, केशर टोक्या, हळदी, कवड्या, गौरांग, भटक्या, स्वैरिणी, अक्कडबा अशी निरनिराळी नावे दिलेली आहेत.