क्रांतिकारी राष्ट्रसंत मुुनिश्री तरुणसागर महाराजांचे १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रात:काली ३.१८ वाजता सल्लेखनापूर्वक समाधी देहावसान झाले आहे. जैन मुनींची दिनचर्या प्रात: दोन वाजल्यापासून प्रतिक्रमणाने सुरू होते. मुनिश्रींची समाधी ३.१८ वाजता म्हणजेच श्रेष्ठ वेळी पूर्णत: जागरूक अवस्थेत झाली. जैनत्वाचे आचरण त्यांनी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत काटेकोरपणे केले आहे.
मुनिश्रींनी युवा पिढीला नजरेसमोर ठेवून कडव्या भाषेत क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून जैन सिद्धान्त लोकांमध्ये रुजविले. आजच्या युगाप्रमाणे जैन सिद्धातांची पुनर्व्याख्या त्यांनी केली आहे. घराघरांतील दररोजच्या व्यवहारातील समस्यांचे समाधान त्यांनी सासू-सून, मुलगा-वडील, पती-पत्नी यांंच्यातील संवादातून दृष्टान्तस्वरूपात प्रवचनातून मांडले. मुल्ला आणि खट्टरकाका ही मुनिश्रींची आवडीची पात्रे. प्रवचनातून उंच्या आवाजात, कटू प्रहार करीत व मिस्कीलपणे हसत जैन तत्त्वज्ञानाचे सार सुभाषितांच्या रूपात समाजापुढे ठेवण्याची आगळीवेगळी शैली असणारे मुनिश्री तरुणसागरजी हे एकमेव दिगंबर मुनी झाले. भविष्यात त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकणार नाहीत.
जैन सिद्धान्त, तत्त्व, आचार, विचार हे सर्व समाजांमध्ये रुजविणारे ते एकमेव महामुनी होते. कितीतरी जैनेतर लोकांनी जैनत्वाची दीक्षा मुनिश्रींकडून घेतली आणि आजतागायत ते त्याचे पालन करीत आहेत. मुनिश्री एकदा म्हणाले,‘‘सुषमा, माल कितना भी अच्छा क्यों न हो, उसकी पॅकिंग जब-तक अच्छी नहीं होती, तब-तक वह बिकता नहीं। इसलिए जैन सिद्धान्त को आज के संदर्भ में कहना आवश्यक है।’’
मुनिश्रींचे दोन ओळींचे प्रत्येक सुभाषित जीवनमूल्य आणि सिद्धान्त यांनी गर्भित आहे. त्यांतील काही उदाहरणार्थ सुभाषिते -
१. महावीर जैनों से मुक्त हो - समतावादी दृष्टिकोनभगवान महावीरांंचा संदेश हा कोण्या एका संप्रदायासाठी नसून संपूर्ण प्राणिमात्रांच्या हितासाठी आहे. त्यांचे संदेश, आदर्श, आचरण जगापुढे येण्यासाठी त्यांना मंदिरातून मुक्त केले पाहिजे.
२. जैन मुनी का कमंडलू, भूमंडल का सबसे बडा अर्थशास्त्र है - अपरिग्रह सिद्धान्तअर्थशास्त्राच्या नियमानुसार खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असावे. कमंडलूला दोन छेद असतात. एक मोठा, की ज्यातून पाणी भरले जाते व दुसरा छेद छोटा, त्यातून पाणी बाहेर काढले जाते. यातून आय-व्यय सिद्धान्त दर्शवितो.
३. जीवन में धर्म और धन दोनों आवश्यक हैं -धर्म आणि धन ही दोन्ही औषधे आहेत. धर्म आत्मशुद्धीचे टॉनिक आहे; ज्यामुळे विचार व शरीर निरोगी राहते. धन बाहेरून लावण्याचे मलम आहे. ज्यामुळे तेवढीच जखम बरी होते. म्हणजे गरजेपुरता धनाचा संचय करावा.
४. पर्यावरण के प्रदूषण से ज्यादा खतरनाक विचारों का प्रदूषण है -पर्यावरणाचे प्रदूषण हे निसर्गातील घटकांचे संतुलन बिघडविते. मनुष्याच्या मन आणि चिंतनातून निर्माण होणारे पापरूपी प्रदूषण हे समस्त प्राणिमात्रांसाठी व संपूर्ण विश्वासाठी घातक आहे; म्हणून प्रदूषित विचारांवर संयम धारण करणे आवश्यक आहे.
५. रक्षाबंधन पर्व खतरे में है -आजच्या कन्याभ्रूण हत्येबद्दल मुनिश्रींनी कडाडून हल्ला केला आहे. देशाच्या या ज्वलंत प्रश्नाबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘‘घराघरांत कत्तलखाने झाले आहेत, डॉक्टरांच्या रूपातील रक्षक भक्षक झाले आहेत. कन्याभ्रूणहत्येची गती अशीच वाढत राहिली तर रक्षाबंधन पर्वामध्ये भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी बहीण कोठून येणार?
६. मृत्यू मातम नहीं, महोत्सव है - सल्लेखनासल्लेखनापूर्वक मृत्यूमध्ये आत्म्याची पूर्णत: सावधानता असते. क्रोध, मान, माया, लोभ व कषाय कमी करून चित्ताला शुद्ध व स्थिर केले जाते. सल्लेखना मृत्यू समीप आला की दिली जाते. यामध्ये मुनी मृत्यूला सहज स्वीकारतात. मृत्यू अटळ असताना समताभावपूर्वक, शांत परिणामांनी मरण म्हणजे समाधीकरण होय. मृत्युमहोत्सव होय.
मुनिश्री तरुणसागर महाराजांच्या २००७ कोल्हापूर चातुर्मासाच्या वेळी ‘लोकमत’मध्ये ‘तरुणवाणी’ लेखमालिका लिहीत असताना मला त्यांचे अलौकिक विलक्षण व्यक्तिमत्त्व भावले, ते आपल्यासमोर ठेवले.- डॉ. सुषमा गुणवंत रोटेनिदेशक, जैन विद्या शोध संस्थान, कोल्हापूर