लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्वच क्षेत्रातील बँकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने आता मोठ्या प्रमाणात थकीत कर्जाबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. जेवढे तुम्ही फेडू शकाल तेवढेच कर्ज घ्या, बँका व अधिकृत फायनान्स कंपन्यांकडूनच कर्ज घ्या, कर्जाचा हप्ता वेळेवर भरून सुज्ञ बना, स्मार्ट बना, जबाबदार बना आणि निश्चिंत राहा! असा स्मार्ट सल्ला मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर कर्जदार ग्राहकांना दिला आहे. या जनजागृतीचा कर्ज वसुलीवर निश्चितच चांगला परिणाम होईल, असे बँक वर्तुळातून सांगण्यात आले.
सध्या मार्च एंडिंगची धामधूम सुरू आहे. कर्जाच्या वसुलीसाठी ग्राहकांना फोन मेसेज, मेल पाठवून कर्ज भरण्याची आठवण केली जात आहे, तर काही ग्राहकांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसाही पाठविल्या गेल्या आहेत. इतके सर्व उद्योग करूनही ग्राहकांकडून कर्जवसुलीबाबत बँकांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. यावर तोडगा म्हणून आता भारतीय रिझर्व्ह बँकेने थकीत कर्जवसुलीच्या दृष्टीने कर्जदारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रथमच जनजागृती सुरू केली आहे.
जेवढी तुमची ऐपत आहे, जेवढे कर्ज तुम्ही फेडू शकाल तेवढेच आणि गरजेपुरते कर्ज घ्या. ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्यासाठीच त्याचा वापर करा. कर्जाचे हप्ते वेळेत भरा आणि आपला क्रेडिट स्कोअर अधिक चांगला बनवा. कर्जाचे हप्ते वेळेत भरल्याने आपल्याबद्दल कर्ज संस्थेला विश्वास संपादन होईल आणि आपला क्रेडिट स्कोअर चांगला वाढेल. त्याचा आपणास पुढील ज्यादा कर्ज मिळण्यास फायदा होईल, असे रिझर्व्ह बँकेने जनहितार्थ प्रसिद्ध केले आहे.
याशिवाय कर्ज घेताना बँका आणि नोंदणीकृत फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घ्या. कर्ज घेताना फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घ्या, असा सल्लाही रिझर्व्ह बँकेने दिला आहे. नोंदणीकृत बँका आणि फायनान्स कंपन्यांचे नियमन रिझर्व्ह बँकेने केलेले असतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकत नाही.
चौकट :
संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका...
भारतीय रिझर्व्ह बँकेने थकीत कर्जदारांना कर्ज वेळेत भरण्याबाबत जशी जनजागृती केली आहे, तशीच जनजागृती ग्राहकांची बँक व्यवहाराबाबत फसवणूक होऊ नये म्हणून केली आहे. त्यात एसएमएस, ई-मेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, असे आवाहनही आरबीआयने केले आहे.