कोल्हापूर : शिर्डी (जि. अहमदनगर) येथे झालेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शनिवारी कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने हिने दिल्लीच्या अनिता कुमारी हिच्यावर १० गुणांनी मात करीत विजेतेपद पटकाविले. यासह तिची हंगेरी येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील ६२ किलो वजन गटात जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच महाराष्टच्या स्वाती शिंदे, अंकिता गुंड व मनाली जाधव यांनी कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चार सुवर्णपदकांची कमाई केली. त्यात रेश्मा माने हिने पहिल्या फेरीत केरळच्या टी. सी. कृष्णा, दुसºया फेरीत सरिता यादव (उत्तर प्रदेश), तिस-या फेरीत हरयाणाच्या पूजादेवी हिचा, तर अंतिम फेरीत दिल्लीच्या अनिता कुमारी हिच्यावर १० विरुद्ध शून्य अशी एकतर्फी मात केली. तिची २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
कोल्हापूरची दुसरी आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर स्वाती शिंदे हिने ६५ किलोगटात कांस्यपदकाची कमाई केली. स्वाती मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्रात सराव करते. जोग महाराज कुस्ती केंद्र, आळंदीची अंकिता गुंड हिने ५९ किलोगटात कांस्यपदकाची कमाई केली. सह्याद्री कुस्ती केंद्र, वारजे (पुणे) येथील मनाली जाधव हिने ६५ किलोगटात कांस्यपदकाची कमाई केली. सांघिक चॅम्पियनशिपमध्ये हरयाणा २०५ गुणांसह प्रथम, दिल्ली (१५४) दुसºया, तर उत्तर प्रदेश (१२३) तिस-या स्थानी राहिला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाºया खेळाडूंची निवड बुडापेस्ट येथे होणा-या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.