विश्वास पाटील -- कोल्हापूर -पहिल्यांदा महिलांना गाभाऱ्यात प्रवेशच देणार नाही, अशी भूमिका. त्याविरोधात सामाजिक दबाव वाढल्यावर मग आम्ही ठराविक वेळेतच त्यांना प्रवेश देऊ. त्यास विरोध झाल्यावर मग तुम्ही देवीच्या दर्शनासाठी साडी नेसूनच आले पाहिजे, असा हट्ट धरणे म्हणजे देवीच्या दर्शनासाठी विशिष्ट समाजाने लागू केलेली ही नवी अस्पृश्यताच आहे. देवीचे मंदिर ही आमची खासगी मालमत्ता असल्यासारखा व्यवहार बुधवारी तृप्ती देसाई यांच्या बाबतीत झाला. धर्मरक्षणाचा ठेका घेतल्याचा आव आणणाऱ्या लोकांनी त्यांची मुलगी शोभेल अशा महिलेला ‘हे कुत्रे’, ‘टवळे’ अशा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन गाभाऱ्यात शिव्या हासडल्या. चुडीदार घातल्याने मंदिर अपवित्र होते म्हणणाऱ्यांनी ज्या शिव्या दिल्या त्यामुळे गाभारा अपवित्र झाला नाही का, हे विचारण्याची वेळ आली आहे.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना कोल्हापुरात बुधवारी अंबाबाई मंदिर प्रवेशावेळी जी मारहाण झाली ती अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांना मंदिर प्रवेश देऊन न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले; परंतु ते करीत असताना जी पूर्वदक्षता घ्यायला हवी होती ती घेतली नाही. कदाचित पोलिसांना त्यांना दर्शनही मिळावे व मारही बसावा, असे वाटत होते की काय, अशी शंका यावी अशी स्थिती होती. देसाई यांच्या विरोधात हिंदुत्ववादी, बेगडी सामाजिक कार्यकर्ते व श्रीपूजकही संतप्त आहेत. त्यांना ‘तू मंदिरात कशी येतेस ते बघतोच’ असे उघड आव्हान दिले गेले होते, तरीही २00 ते ३00 जणांचा जमाव पोलिस मंदिरात बसवून देवीची आरती करणार होते की काय हेच समजत नाही. एकदा देसाई यांची रॅली अडविली होती. त्यांना चार महिलांसह गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घ्यायचे होते. त्याला पोलिस प्रशासनानेही तयारी दर्शविली होती. मग असे असताना एवढा जमाव मंदिरात जमा होत असताना पोलिस हातावर हात ठेवून बसून राहिले. त्यामुळेच मारहाण व शिवीगाळ करण्याचा घाणेरडा प्रकार घडला.अनेकजण देसाई यांना देवीच्या दर्शनापेक्षा आंदोलनाचा स्टंट करायचा होता, असे म्हणतात; परंतु हा स्टंट अगोदर कुणी सुरू केला हे सर्वजण सोयीस्करपणे विसरत आहेत. पाच वर्षांपूर्वी आमदार राम कदम व भाजपच्या नीता केळकर यांनी देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले होते. त्याचा त्यावेळी बराच गाजावाजा झाला; परंतु तो प्रवेश तत्कालिक ठरला. पुन्हा देवीच्या चांदीच्या गाभाऱ्यापासूनच प्रवेश दिला जाऊ लागला. देवीच्या गाभाऱ्यातच जाऊन दर्शन घेतल्यावर ती प्रसन्न होते, अन्यथा नाही. त्यामुळे गाभाऱ्यात जाण्याचा हट्ट चुकीचा आहे, असाही एक मतप्रवाह आहे. खरंतर या सगळ्या गोष्टी तुमच्या श्रद्धेशी जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्ही त्याकडे कसे पाहता हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.चुडीदार घालण्यास विरोध नसता आणि त्यांनी येऊन देवीचे दर्शन घेऊन गेल्या असत्या तर मारहाण व पुढील कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला नसता. देसाई यांच्या रॅलीस विरोध का करण्यात आला हे देखील एक कोडेच आहे. शनिशिंगणापूर व अंबाबाई मंदिरात महिलांना प्रवेश मिळाला म्हणून त्या विजयी रॅली काढणार होत्या. त्यातून कोणते सामाजिक स्वास्थ्य बिघडणार होते म्हणून त्यांच्या रॅलीस हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला. त्याचे खरे कारण त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचे आंदोलन केले, त्याची न्यायालयाला दखल घ्यायला लागली व त्यातून ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले त्यांनाच ही रॅली नको होती. देसाई कोल्हापूर येऊन आंदोलन का करते, असाही प्रश्न (हॅलो पान ६ वर) मंदिरातील हुकूमशाहीला विरोध केल्यानेच मारहाणपंढरीला पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांच्या पाया पडून पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा आनंद मानणारी आपली संस्कृती आहे; परंतु म्हणून याचा अर्थ पुजारी, बडवे, श्रीपूजक हे म्हणतील तसेच मंदिरात चालणार आणि माणूस म्हणून इतरांना जे अधिकार घटनेने दिलेले आहेत ते तिथे वापरता येणार नसतील, तर मग ही नवीच अस्पृश्यता ड्रेसकोडच्या आडून रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाणवते. मंदिरात कोणते कपडे घालून महिलांनी जायचे हे कायद्याने कुठेच निश्चित करून ठेवलेले नाही. मंदिराच्या गाभाऱ्यावर आमची मालकी आहे व आम्ही सांगू तेच तिथे चालेल अशीच ही हुकूमशाही आहे. त्यास देसाई यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्यामुळेच त्यांना मारहाण करण्यात आली.
ड्रेसकोडवरून विरोध ही तर नवी अस्पृश्यता
By admin | Published: April 14, 2016 11:42 PM