कोल्हापूर : आरटीओच्या नियमांप्रमाणे ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही अशी वाहने शहरात चालविण्यास महानगरपालिकेकडील चालकांनी शुक्रवारी नकार दिल्याने सकाळी दोन तास सेवा-सुविधांवर परिणाम झाला. के.एम.टी. बस अपघाताची घटना घडल्यानंतरही महापालिका वर्कशॉप विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याची बाब चालकांच्या असहकारातून पुढे आली. दरम्यान, येत्या पंधरा दिवसात पासिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालकांनी असहकार मागे घेतला.
महानगरपालिकेच्या वाहनताफ्यातील विविध प्रकारच्या तब्बल चाळीस वाहनांचे आरटीओ पासिंग झालेले नाही तरीही अत्यावश्यक सेवेत असल्याने ही वाहने रस्त्यांवरून फिरत आहेत. चालकही धोका पत्करून वाहने चालवत होते; परंतु के.एम.टी. बसचा अपघात झाल्यानंतर महापालिका वर्कशॉपकडील सर्व वाहनांची देखभाल-दुरूस्ती रोज झाली पाहिजे तसेच त्या वाहनांबाबत काही त्रुटी, दोष असतील तर त्या वाहन रजिस्टरमध्ये नोंद केल्या पाहिजेत, याची सक्ती चालकांवर करण्यात आली. त्यामुळे चालकांनी आधी वाहनांचे पासिंग करून घ्या, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पासिंगची प्रक्रिया अपघातानंतर तरी तातडीने होईल, अशी अपेक्षा असताना अधिकारी पातळीवर उदासीनता दिसून आल्याने शुक्रवारी चालकांनी ही वाहने बाहेर काढण्यास नकार दिला.
प्रभारी सहायक आयुक्त संजय सरनाईक, वर्कशॉप अधीक्षक रावसाहेब चव्हाण यांनी तातडीने चालकांची भेट घेऊन नागरी सुविधांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. अवजड वाहनांना स्पीड कंट्रोल युनिट बसविण्याची सक्ती ‘आरटीओ’ने केली असल्याने त्याच्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागली. त्यामुळे पासिंग रखडले आहे; पण येत्या पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे चव्हाण यांनी चालकांना सांगितले. त्यानंतर चालकांनी आपला असहकार मागे घेतला.४० वाहने विनापरवाना रस्त्यावरआरटीओ पासिंग झाल्याखेरीज कोणतेही वाहन रस्त्यावर फिरत नाही. मात्र, महानगरपालिकेची तब्बल ४० वाहने रस्त्यावर फिरत आहेत. आरोग्य, पाणीपुरवठा विभागाकडील ही वाहने असल्याने प्रशासनाने तशीच ही वाहने रस्त्यावर आणली आहेत. वास्तविक ही बाब अतिशय गंभीर आहे तरीही तांत्रिक अडचणीत ही वाहने बंद राहून त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ नये म्हणून वाहने रस्त्यावर आणली जात आहेत.