सुनील चौगले ।भोगावती : एकेकाळी साखर उद्योगात ज्या कारखान्याचा आदर्श घेतला जात होता, तो भोगावती साखर कारखाना सध्या आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करत आहे; पण पी. एन. पाटील यांचा स्वच्छ कारभार, सचोटी आणि निष्ठेने काम सुरू आहे. कारखान्याच्या गतवैभवासाठी त्यांनी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व संचालकांना सोबत घेऊन शर्थीचे प्रयत्न असून, कोणत्याही परिस्थितीत सामान्य माणसांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना भक्कम केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, ही खूणगाठ बांधूनच ते कार्यरत असून, गेल्या दोन वर्षांत विविध मार्गांनी कारखान्याची २० कोटी रुपयांची बचत केली आहे.
साखर कारखानदारी कशा पद्धतीने चालवायची? उत्तम प्रशासन कसे असते? हे पाहण्यासाठी राज्यातील कारखानदार ‘भोगावती’ला भेट देत होते. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने झेपावत होती. या कालावधीत कारखान्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार पटकाविले. ‘भोगावती’च्या बळावरच परिसरातील सामान्य माणसाला ताकद देण्याचे काम पी. एन. पाटील यांनी केले. रोजगार असो, शेती, दुग्ध व्यवसाय असो; या माध्यमातून सामान्य माणसाला उभे करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले; पण मध्यंतरीच्या काळात राजकीय सत्तासंघर्षात कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला. सभासद, कामगारांची अवहेलना झाली आणि प्रशासक आले.
जिल्ह्यातील दोन-तीन कारखान्यांची उदाहरणे डोळ्यांसमोर असल्याने सभासद धास्तावले होते. प्रशासकीय कालावधी संपुष्टात येऊन, कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल करण्याचे नियोजन होते; पण आता तुम्ही नेतृत्व न करता त्यांच्यावरच कारभाराची जबाबदारी टाकण्याचा आग्रह सभासदांनी केला. सभासदांच्या रेट्याने पाटील यांना स्वत: रिंग्ांणात उतरले. सभासदांनी दाखविलेल्या मोठ्या विश्वासाचे शिवधनुष्य त्यांनी उचलले खरे; पण याच कालावधीत देशातील साखर उद्योग अडचणीत आला. साखरेच्या दरातील चढउताराने उद्योग उद्ध्वस्त होतो की काय? अशी परिस्थिती असताना कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व संचालकांना सोबत घेऊन त्यांनी अडचणींवर मात करण्यास सुरुवात केली. कारखान्याची कोणतीही सेवा घ्यायची नाही, याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केल्याने संचालकांनाही ते आपोआपच लागू झाले. गेले दोन गळीत हंंगाम त्यांनी ताकदीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांत विविध मार्गांनी सुमारे २० कोटींची बचत केली. सध्या विविध संकटे त्यांच्यासमोर असली तरी सभासद व कामगारांच्या विश्वासावर याही संकटातूनही ते मार्ग काढतील.संचालक मंडळाकडून कारखान्याची कोणतीही सुविधा घेतली जात नाही. त्यामुळे मोठी बचत झाली आहे.