मुरगूड : केंद्र शासनाने शेतकर्यांसाठी केलेला अन्यायकारक असणारा कृषी कायदा रद्द करावा, या मागणीचा ठराव तसेच खासदार संजय मंडलिक यांनी मुरगूडच्या विकासासाठी अनेक योजना मार्गी लावल्या त्याबद्दल पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात फोटो लावून अभिनंदन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तर शहरातील सर्व रस्त्यांसाठी १५ कोटी ५५ लाख खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या ठरावास मंजुरी मिळाली.
आठ महिन्यांनंतर पालिकेच्या नूतन यशवंतराव चव्हाण सभागृहात सभा शांततेत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. विषयपत्रिकेवरील सुमारे पंचवीस विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
मुरगूड पालिकेने सुधारित नळ पाणी योजनेचे काम सुरू केले असून, त्यामुळे रस्ते खराब झाले आहेत . त्यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे. त्याकरिता १५ कोटी ५५ लाख खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासंबंधी पालिका सभेत महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. यावेळ आठ कोटी ४२ लाखांच्या सुधारित पाणीपुरवठा योजना सुरू कामाची तसेच ग्रामदैवत अंबाबाई देवालयाच्या पूर्णत्वास आलेल्या कामाची माहिती सभागृहाला देण्यात आली. ही दोन्ही कामे सध्या प्रगतिपथावर असून, देवालयाचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे पालिका अभियंता प्रकाश पोतदार यांनी सभागृहात सांगितले.
सुधारित पाणीपुरवठा योजना मंजुरी वेळी शहरात २२५० नळ कनेक्शन आहेत असे दाखवले आहे. आणखी साडेतीनशे कनेक्शन वाढणार असे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले. सभेमध्ये नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे , पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, नगरसेवक नामदेवराव मेंडके, धनाजी गोधडे, आदींनी चर्चेमध्ये सहभाग दर्शवला. मुख्याधिकारी संजय गायकवाड, स्नेहल पाटील, अनिकेत सूर्यवंशी, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर यांनी प्रशासकीय माहिती पुरवली.