कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचा ठराव मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते.शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा, यासाठी मराठा महासंघ २००६पासून कोल्हापुरात विविध समाजबांधव व शिवप्रेमींना घेऊन प्रयत्न करत आहे. महाआघाडी सरकारने यावर्षीपासून ६ जून शिवराज्याभिषेक दिन हा ह्यस्वराज्य दिनह्ण म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गावोगावी, शासकीय कार्यालयात हा दिन साजरा करण्याचा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतल्याबद्दल त्यांचे तमाम शिवप्रेमींच्यावतीने अभिनंदन करत असल्याचे वसंतराव मुळीक यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्याभिषेक सोहळा घराघरात पोहोचणार आहे. यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे मंत्री मुश्रीफ यांचा लवकरच भव्य नागरी सत्कार करणार असल्याचेही मुळीक यांनी सांगितले.
यावेळी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, शंकरराव शेळके, बबनराव रानगे, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, अमित अडसुळे, कादर मलबारी, प्रकाश पाटील, अशोक माळी, आनंद म्हाळूंगकर, महादेव पाटील, डॉ. शिवाजीराव हिलगे, सुनील पाटील, मारुती पोवार, कुमार काटकर, किशोर चव्हाण, गुरुदास जाधव, जयवंत पलंगे, शरद साळुंखे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.