सरते वर्ष २०१६ ला निरोप देऊन सन २०१७चे आपण सर्वांनी आपापल्या पध्दतीने स्वागत केले. प्रतिवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना नवनवीन संकल्प सोडले जातात, परंतु अनेकांचे हे संकल्प जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच मागे पडतात. कारण संकल्प केला तरी तो पूर्णत्वास नेण्यासाठी जी मनाची जिगर लागते ती अनेकांकडे नसते. त्याचप्रमाणे जुन्या वर्षातील चांगल्या-वाईट घटनांच्या जमा-खर्चाचा आढावा घेतला जातो. सरत्या वर्षात काय कमावले व काय गमावले याचा ताळमेळ मांडला जातो. अनेकांच्या बाबतीत हा आर्थिक उलाढालीचा असतो, तर काही जणांसाठी तो प्रिय-अप्रिय घटनांचा असतो; पण फारच कमी लोक आरोग्याचा जमा-खर्च मांडतात. सरत्या वर्षानुसार वय वाढत जाते. वाढत्या वयानुसार सहसा आरोग्याचा आलेख छोटा होत जातो आणि आजारांचा आलेख मात्र मोठा होत जातो. सर्व आजार औषधाने बरे होतात, अशा भ्रामक समजुतीमुळे, आरोग्य समजावून घेऊन आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा ‘आजार आल्यावर बघू’ या समजुतीवर जास्त विश्वास ठेवला जातो. गेल्या पन्नास वर्षांच्या आजारांचा आढावा घेतल्यास संसर्गजन्य आजारांवर आपण चांगल्यारितीने नियंत्रण मिळविले आहे. देवी, पोलिओ यांचे निर्मूलन झाले आहे. गोवर, घटसर्प, डांग्या खोकला या आजारांच्या संख्येत कमालीची घट झालेली आहे. कावीळ, मेंदूज्वर, न्यूमोनिया, जुलाब, कांजिण्या, पोलिओ यासारख्या आजारांवर प्रभावी लस उपलब्ध झाल्याने या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या आयुर्मानात मोठी वाढ झाली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी सन १९४७ मध्ये ३१ वर्षांची असणारी आयुर्मर्यादा आज ६६ वयापर्यंत पोहोचली आहे. विविध शासकीय आरोग्य योजना सरकारी व खासगी आरोग्य केंद्रांमार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्याने औषधोपचार सुलभ झाले आहेत.परंतु याच कालावधीमध्ये जीवनशैलीशी निगडित मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, दमा, लठ्ठपणा यासारख्या जंतूविरहित आजारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. वृद्धापकाळामधील वैद्यकीय आजार, प्रदूषणाशी संबंधित विकार, एचआयव्ही संसर्ग यासारख्या वैद्यकीय समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. जंतूजन्य आजारांसाठी रामबाण ठरलेली जंतुनाशक औषधांची धारदार तलवार त्याच्या अतिरेकी वापराने बोथट होत चालली आहे. आपले आयुर्मान वाढले; पण या आरोग्य समस्यांमुळे ते वाढलेले आयुष्य आरोग्यदायी व चैतन्यमय झाले का, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार टाळणे ही आरोग्यासाठी केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे. पुरातन भारतीय आयुर्वेद शास्त्रानुसार योग्य आहार, योग्य विहार, योग्य विचार आणि योग्य आचरण यांमुळे निरोगी दीर्घायुष्य जगणे शक्य आहे. या नववर्षाचे स्वागत करताना आपल्या विचारांची दिशा रोगाकडून आरोग्याकडे वळवून निरोगी आरोग्याचा संकल्प करूया. मी या सदरातून वर्षभर त्यासंबंधीच तुमच्याशी हितगुज करणार आहे. आरोग्य म्हटले की सर्वांच्याच दृष्टीने त्यास सारखेच महत्त्व, परंतु मुख्यत: लहान मुलांच्या आरोग्याविषयी लोकांत अधिक जागरूकतेची गरज आहे. त्यामुळे लहान मुलांचे आजार, त्याविषयी घ्यावयाची काळजी, पालकांच्या मनांत असलेल्या विविध शंका, त्याच्या संगोपनाविषयीच्या काही चुकीच्या परंतु प्रथा म्हणून चालत आलेल्या प्रथा-परंपरा या सर्वांबाबत मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. - डॉ. मोहन पाटील (डॉ. मोहन पाटील हे नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत.त्यांनी सीपीआरमध्येही बालरोग विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे.)
संकल्प आरोग्याचा
By admin | Published: January 04, 2017 12:01 AM