लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा सर्रास वापर होणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून एका गटाकडून ठरावधारकांना ५० हजाराचे पहिले टोकण पोहोचले आहे. निवडणुकीत कमालीची ईर्षा निर्माण होऊन टोकाचा संघर्ष पाहावयास मिळणार असल्याने यामध्ये एका ठरावाची मजल लाखापर्यंत जाणार, हे निश्चित आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत ठरावधारकाला खूप महत्त्व आहे. ठरावधारकांना खूश केले की सत्ता आपसूकच आपल्या हातात येते, हे साधे गणित असल्याने, काही चेहरे बदलले मात्र सत्ता तिथेच राहिली. जिल्ह्याच्या राजकारणात घोडेबाजार काही नवीन नाही. जिल्हा परिषद, महापालिका, विधानपरिषद निवडणुकीत आपण अनेक वर्षे पाहतो. ‘गोकुळ’मध्येही हा प्रकार कमी प्रमाणात का असेना, होतो. सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूने सत्ता हिसकावून घेण्यासाठी प्रलोभनाचे राजकारण केले जाते. ठराविक लोकांच्या हातातच मताचा अधिकार राहिल्याने मोजक्या लोकांना खूश केले की सत्ता ताब्यात घेता येते, हे साधे सूत्र आहे. त्यानुसार ‘गाेकुळ’च्या प्रत्येक निवडणुकीत ठरावधारकांना वेगवेगळ्या मार्गाने खूश केले जाते. सहलीबरोबरच पाकिटेही पोहोच होतात. मागील निवडणुकीत संचालकांनी आपापल्या पातळीवर ठरावधारकांना खूश केले, साधारणत: दहा ते वीस हजारापर्यंत ठराव. मात्र यावेळेला निवडणुकीत कमालीची ईर्षा पाहावयास मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता सोडायची नाही, असा चंग सत्तारूढ गटाने बांधला आहे, तर काही झाले तरी सत्ता खेचून आणायचीच, यासाठी विराेधकांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून एका गटाने ठरावधारकांना ५० हजाराचे टोकन पाेहोच केले आहे. प्रत्यक्ष मतापर्यंत हा आकडा लाखापर्यंत गेला, तर आश्चर्य वाटायला नको.
शेणा-मुतात राबणारे अधिकाराविनाच
दूध उत्पादकांचे नाव घेऊन ‘गोकुळ’चे राजकारण करायचे, मात्र त्यांना मताचा अधिकार द्यायचा म्हटला की सर्वपक्षीय विराेध होतो. दूध व्यवसायातील दुखणी काय, हे फक्त शेणा-मुतात राबणाऱ्यांनाच माहिती असतात. मात्र दुर्दैवाने ज्याच्या जिवावर राजकारण केले जाते, तोच आपल्या हक्काचा प्रतिनिधी निवडू शकत नाही, हे वास्तव आहे.
प्रतिनिधी नेमतानाच ठरावाची विक्री
‘गोकुळ’साठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच संचालकांची यंत्रणा सक्रिय होते. त्याचवेळी योग्य तो मोबदला देऊन आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर ठराव करून घेतले आहेत, अशा ठरावांची संख्याही मोठी आहे.
किमतीच्या पलीकडची नैतिकता
एकीकडे ठरावाची किंमत लाखाच्या घरात पोहोचली असताना, दुसऱ्या बाजूला काही ठरावधारकांनी स्वत:च्या मताच्या किमतीपलीकडेही नैतिकता जोपासली आहे. कोणत्याही प्रलोभनाला न जुमानता स्वत:च्या गाडीतून जाऊन मतदान करणारे सभासदही ‘गोकुळ’मध्ये आहेत.