आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १0 : सभासदांच्या नावांचा बोगस वापर करून सांस्कृतिक हॉलचा गैरवापर राजरोस सुरू असून, संस्थेमध्ये अशा प्रकारचे टोळके तयार झाल्याचा आरोप जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या शनिवारी झालेल्या ५१ व्या सभेत अजित मगदूम यांनी केला.
बोगसगिरी करून सभासदांची फसवणूक करणार असाल तर सभासदांसाठी मोफत हॉल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष महावीर सोळांकुरे होते.
संस्था कर्जमुक्त झाल्याने संस्थेचा सांस्कृतिक हॉल सभासदांना कौटुंबिक कार्यक्रमासाठी मोफत द्यावा, अशी मागणी अजित मगदूम यांनी केली. त्यावर काही सभासदांनी हरकत घेतली. मोफत दिला तर त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काय? त्याचबरोबर हॉलचा वापर शेजारील तालुक्यांतील सभासदांनाच होत असल्याचे एस. डी. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
सभासदांना मोफत देऊ नकाच; पण सभासदांच्या नावावर दुसरे वापरतात त्याचे काय? दुर्दैवाने संस्थेत असे करणारे टोळके तयार झाले आहे. संस्थेची फसवणूक होताना संचालक म्हणून आपण कोणती भूमिका घेतली? अशी विचारनाही मगदूम यांनी केली. अशी फसवणूक होत असेल तर मग सभासदांना मोफत हॉल दिलाच पाहिजे, कुटुंबाची नेमकी व्याख्या काय केली? अशी विचारणा बंडा प्रभावळे यांनी केली. यावर येथून पुढे असे उघडकीस आले तर निश्चितच कारवाई करू, अशी ग्वाही अध्यक्ष सोळांकुरे यांनी दिली.
एक टक्का जादा लाभांश देण्यापेक्षा कर्जावरील व्याजदर कमी केला तर त्याचा दर महिन्याला फायदा होईल, असे सचिन जाधव यांनी सांगितले. कर्जाचा व्याजदर कमी करावा, असा ठराव याकूब सदलगे यांनी मांडला. त्याला टाळ्यांच्या गजरात मान्यता देण्यात आली.
दिवाळी भेट म्हणून साखर व तेल देण्याची मागणी ए. बी. अष्टेकर यांनी केली. सचिन मगर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात महावीर सोळांकुरे यांनी आढावा घेतला. विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांनी केले. उपाध्यक्ष शिवाजी काळे यांनी आभार मानले. यावेळी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला.
आण्णा व्याजदर तेवढा कमी करा !
अध्यक्ष सोळांकुरे हे जिल्हा परिषदेत ‘आण्णा’ या नावाचे परिचित आहेत. ‘आण्णा तुमची लकब दाखवा आणि कर्जावरील व्याज कमी करा’ अशा उपहासात्मक काव्याच्या माध्यमातून अजित मगदूम यांनी मागणी केली.
वर सभा खाली जेवणावळ
सभा दुपारी एक वाजता सुरू झाली; पण त्याच वेळेला सभागृहाच्या खाली जेवणावळ सुरू झाली. त्यामुळे निम्म्याहून अधिक सभासद जेवणातच गुंतले होते.
असे झाले ठराव
कर्जावरील व्याज दर कमी करा
वाहन, गृह, सोनेतारण कर्जपुरवठा करा
शाखाधिकाऱ्यांचे अभिनंदन