लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांना पदावरून हटविण्याचा ठराव दोन दिवसांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत एकमुखाने करण्यात आला. निर्मळ हे सेवानिवृत्त असल्याने त्यांना जबाबदारीच्या पदावर ठेवणे अयोग्य असल्याचे बहुतांशी संचालकांचे म्हणणे आहे.
शेतकरी संघाचा कारभार नेहमी चर्चेत राहिला आहे. सध्या मुख्य व्यवस्थापकांना पदावरून हटविण्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ हे दीड वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. संघ आर्थिक अडचणीत असताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच दोन वर्षे पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार निर्मळ हे गेली दीड वर्षे मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने आपणास वाहतूक भत्ता द्यावा, अशी मागणी निर्मळ यांनी संचालक मंडळाकडे केली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर बहुतांशी संचालकांनी हरकत घेतल्याचे समजते. लॉकडाऊन असले तरी सर्वच कर्मचारी कामावर येत आहेत, मग निर्मळ यांनाच वाहतूक भत्ता का द्यायचा? त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, असे एका ज्येष्ठ संचालकांनी सांगितले. हाच मुद्दा उचलून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला जबाबदारीच्या पदावर ठेवणे उचित होणार नसल्याने त्यांना पदावरून बाजूला करण्याचा ठराव करण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने ते अद्याप त्या पदावरच काम करीत आहेत.
कोट-
मुख्य व्यवस्थापक पदावरून हटविण्याबाबतचा निर्णय अद्याप शेतकरी संघाच्या बैठकीत झालेला नाही.
- आप्पासाहेब निर्मळ