कोल्हापूर : भाजपकडून ४०० ठराव आल्याची केलेली वल्गना ही अतिशयोक्तीच आहे. मागीलवेळीही सत्ताधाऱ्यांकडेच सर्वाधिक ठराव होते; पण मते किती पडली, याची आठवण करून देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कितीही गठ्ठ्याने ठराव जाऊ देत, असे सांगताच मध्येच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महाडिकांकडे जाणारे हे ठराव झेरॉक्स कॉपी आहेत’, असा चिमटा काढला. मागीलवेळी मी एकाकी लढत होतो, सत्ता थोड्या मतांनी हुकली, आता मुश्रीफ माझ्यासोबत आहेत, तेव्हा ‘गोकुळ’चे मैदान नक्कीच मारू, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे गुरुवारी कोल्हापूर दौºयावर होते. शासकीय विश्रामगृहावर विविध विभागांच्या आढावा बैठका घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत भाजपची ताकद महाडिकांच्या मागे राहणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री पाटील यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘मोठे बोलणे, अतिशयोक्तीपूर्ण बोलणे, ही काहींची सवयच झाली आहे. त्यातून भाजपकडे ४०० ठराव असल्याचे म्हटले गेले आहे. गत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. सर्वाधिक ठराव त्यांच्या बाजूने असतानाही त्यांना विजयासाठी झुंजावे लागले. थोड्या मतांनी आमचा पराभव झाला; पण आम्ही ‘गोकुळ’ सभासदांच्या मालकीचा राहावा; यासाठी संघर्ष कायम ठेवला आहे. आताही तीच भूमिका आहे.
मागीलवेळी मी एकाकी लढत दिली होती. आता मुश्रीफ आमच्यासोबत असल्याने संघर्ष अधिक तीव्र होईल. त्यांनी कितीही ठराव गोळा करू देत, काही फरक पडत नाही. मल्टिस्टेट ठरावावेळी काय घडले होते, हे सत्ताधाºयांनी विसरू नये, असा सल्लाही मंत्री पाटील यांनी दिला.
- चुयेकर यांचेही नरकेंच्या पावलावर पाऊल
जयश्री पाटील यांची निवृत्तीची घोषणा : शशिकांत रिंगणात असणारकोल्हापूर : मागील आठवड्यात ‘गोकुळ’चे संस्थापक-संचालक अरुण नरके यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता चुयेकर कुटुंबीयांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. संस्थापक-चेअरमन असलेले दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मृतिदिनीच त्यांच्या पत्नी व विद्यमान संचालक जयश्री पाटील यांनी निवृत्तीची घोषणा करताना मुलगा शशिकांत निवडणुकीत उमेदवार असेल, असे जाहीर केले आहे. आठवडाभराच्या फरकाने ‘गोकुळ’ची उभारणी केलेल्या संस्थापक कुटुंबातील खांदेपालट चर्चेचा विषय ठरली आहे.
- गोकुळसाठी एप्रिलमध्ये मतदान होणार असले तरी ठराव संकलनावरून जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. या वातावरणाला वेगळे वळण देणारी घटना मागील आठवड्यात घडली. दूध संघाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान असलेले अरुण नरके यांनी आपण ‘गोकुळ’मधून निवृत्ती घेत आहोत, माझ्याऐवजी मुलगा चेतन नरके हा उमेदवार, असे जाहीर केले. संस्थापक संचालकांच्या या ऐनवेळच्या निवृत्तीवरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच गुरुवारी आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कुटुंबीयांकडून धक्का दिला. चुयेकर यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आपण निवडणुकीला उभे राहणार नाही, येणाऱ्या निवडणुकीत मुलगा शशिकांत पाटील चुयेकर हेच उमेदवार असतील, असे जाहीर केले.संघाच्या संस्थापक कुटुंबातील खांदेपालट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.