कोल्हापूर : विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्या साठीची कार्यवाही प्रशासनाच्या पातळीवर सुरू आहे. हे प्रश्न लवकरच सोडविले जातील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना दिली.विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी विद्यापीठ सेवक संघाने पुन्हा आंदोलनाची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि त्याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेणारी वृत्तमालिका दि. २२ ते २५ आॅक्टोबरदरम्यान प्रसिद्ध केली. त्यावर प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यासह प्रशासन सकारात्मक आहे. माझ्या उपस्थितीमध्ये सेवक संघाच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीतदेखील संबंधित प्रश्न मार्गी लावण्याबाबतची माझी भूमिका मांडली आहे. त्यानंतर झालेल्या बैठकांमध्ये देखील माझी भूमिका ठाम राहिली आहे. प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत. कार्यवाहीची गती वाढविण्यासाठी प्रशासनातील अपुरे मनुष्यबळ, दैनंदिन कामकाजासह अन्य अडचणी या अडथळा ठरत आहेत. त्यामुळे निश्चितच विलंब लागत असेल. जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते लवकरच सोडविले जातील. याबाबत सेवक संघासमवेत चर्चेसाठी माझी कधीही तयारी आहे. संघाचे शिष्टमंडळ चर्चेसाठी आल्यास त्यांचे स्वागत आहे. कर्मचारी हे विद्यापीठाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे मला वेळ मिळाल्यास मी त्यांच्याकडे चर्चेसाठी जाईन. याबाबत माझी कोणतीही औपचारिकता असणार नाही. प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. (प्रतिनिधी) सकारात्मक दृष्टीची गरजकर्मचाऱ्यांनी आपली विद्यापीठाशी असलेली बांधीलकी जपत कार्यरत राहावे. त्यांनी प्रशासनासमोरील अडचणींचा विचार करावा. मागण्यांच्या पूर्ततेबाबत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. शिवाय त्यादृष्टीने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कुलगुरु डॉ. शिंदे यांनी केले.
कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवू
By admin | Published: October 27, 2016 12:32 AM