आजरा : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मार्गी लावावा. मंत्री, खासदार व आमदार यांनी मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यत: मराठा समाजाचा जो उद्रेक होईल त्याला सर्वस्वी राज्य शासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे व तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांना दिले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरविले आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. गेले अनेक वर्षे सनदशीर व लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मराठा समाज लढत आहे. लाखोंचे मूक मोर्चे काढून संपूर्ण देशाला एक आदर्श घालून दिला आहे. दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले त्यामुळे मराठा समाजातील युवकांचे खच्चीकरण झाले आहे. सध्या कोरोनाचे संकट विचारात घेता सकल मराठा समाजाला संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण देणे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिकित्सा ज्येष्ठ विधीतज्ज्ञामार्फत करून घेणे, तातडीने मराठा आरक्षणाचा ठराव विधिमंडळात करून केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा ठराव संसदेत मंजूर करून घेण्यास भाग पाडावे व राष्ट्रपतींच्या सहीने मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी यासाठी सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
मराठा समाजाच्या प्रगतीचा पाया ठरणारी सारथी या संस्थेचा विस्तार करावा, सारथी संस्थेची उपकेंद्रे स्थापन करावीत, सारथी संस्थेवर समाजातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करावी, प्रत्येकवर्षी सारथी संस्थेला दोन हजार कोटींचा निधी द्यावा, कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची भूमिका व्यापक करावी व व्यवसायासोबत कर्जाचा समावेश महामंडळामध्ये करावा, सरकारी नोकरीमध्ये सन २०१४ पासून मराठा आरक्षणामधून ज्यांची निवड झाली आहे. त्यांना तातडीने नोकरीवर रुजू करून घ्यावे. नोकरी व शिक्षणामध्ये ज्या सुविधा ओबीसी प्रवर्गासाठी आहेत. त्याप्रमाणे मराठा समाजाला मिळण्याची तरतूद करावी, यासह अन्य मागण्या निवेदनातून केल्या आहेत.
निवेदनावर, जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, आजरा तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, कार्याध्यक्ष संभाजी इंजल, सरचिटणीस प्रकाश देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मंत्री, खासदार व आमदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.
----------------------
-
फोटो ओळी : मराठा आरक्षणासंदर्भात आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देताना मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, संभाजी इंजल व प्रकाश देसाई, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १००५२०२१-गड-०२