लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या वसाहतीचा व तेथील सोयी-सुविधांचा प्रश्न मार्चअखेर मार्गी लावा, अशी सूचना खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुनर्वसन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्यासह शाहूवाडी, इचलकरंजी, राधानगरीचे प्रांताधिकारी, कार्यकारी अभियंता, वनअधिकारी उपस्थित होते. वारणा धरण व चांदोली प्रकल्पग्रस्तांनी खासदार माने यांच्याकडे पुनर्वसनासंबंधीचे तक्रार अर्ज दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
यावेळी खासदार माने म्हणाले, वारणा धरणग्रस्तांच्या वसाहती स्थापन होऊन ३५ वर्षे झाली तरी तेथे सुविधांची वानवा आहे. जमीन वाटपापासून वंचित असलेल्या ७०० ते ९०० खातेदारांना शिल्लक संपादन जमिनीचे वाटप करावे. सांगलीप्रमाणे वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्तांना निर्वाह भत्ता, घरबांधणी व शौचालय अनुदानाचे वाटप केले जावे. धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीचा कालावधी ठरवून घ्या, त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिबिरे घ्या, वारंवार बैठका घेऊन पुनर्वसनाच्या कामाचा आढावा घेण्यात यावा अशी सूचना केली.
---
फोटो नं १०१२२०२०-कोल-पूर्नवसन बैठक
ओळ : कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसन आढावा बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार उपस्थित होते.
---
इंदुमती गणेश