वडणगे : चांगले विद्यार्थी घडविण्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरू. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी घेत आजपासून मी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हक्काचा आमदार असेन, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. वडणगे (ता. करवीर) येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ४४व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पन्हाळा, शाहूवाडीचे आ. सत्यजित पाटील व शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत होते. आ. सतेज पाटील म्हणाले, देशामध्ये सगळ्यात जास्त प्रयोग शिक्षण खात्यावर झाले आहेत. शिक्षणव्यवस्थेत होत असणाऱ्या बदलाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचा गेल्या १० ते १५ वर्षांपासून संघर्षात्मक लढा सुरू आहे. या संघर्षाची सुरुवात कोल्हापूरच्या मातीतून होत आहे. कोल्हापूरच्या पाचवीलाच संघर्ष पूजला आहे. संघर्षातून निश्चितपणे चांगलेच होईल. ग्रामीण शिक्षणाला भरपूर अडचणी आहेत. पुढच्या काळात असे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. या मागण्यांसाठी विधान परिषदेत निश्चित पाठिंबा देऊ. आमदार सत्यजित पाटील म्हणाले, शाळेतील नावनोंदणी करण्यापासून शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना देईपर्यंत याबरोबरच सर्व शासकीय कामांच्या जबाबदाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी काळजीपूर्वक पार पाडतात. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित बसून चांगला निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून सर्व ताकदीनिशी त्यांचे प्रश्न मिटविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. शिक्षक आ. दत्तात्रय सामंत म्हणाले, शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख घटक आहे. वर्षानुवर्षे मागतो त्या मागण्या सत्तेत असणाऱ्या सरकारने मान्य कराव्यात, अन्यथा शाळा चालविणे अवघड होईल. सरकारने न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात राज्यस्तरीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाचे उद्घाटन आ. सतेज पाटील, आ. सत्यजित पाटील, आ. दत्तात्रय सामंत, महामंडळाचे सहकार्यवाहक शिवाजी खांडेकर, महामंडळ कार्याध्यक्ष अविनाश चडगुळवार, महामंडळ अध्यक्ष वाल्मीक सुरासे, जिल्हाध्यक्ष डी. एम. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जयंत आसगावकर, एस. डी. लाड, के. बी. पवार, वडणगे शिक्षण संस्था अध्यक्ष राजाराम पाटील, बाजार समिती उपाध्यक्ष विलास साठे, आर. वाय. पाटील, मुख्याध्यापक बी. वाय. पाटील, उपाध्यक्ष शोभा तांबे, श्रीमती प्रिती भोसले, सरपंच जयश्री नाईक, आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू
By admin | Published: February 01, 2016 12:52 AM