आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २८ : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीतर्फे चालणाऱ्या बालचित्रपट चळवळीअंतर्गत रविवारी स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित बीएफजी हा चित्रपट दाखविण्यात आला. हा चित्रपट पाहण्यासाठी बच्चेकंपनींने शाहू स्मारक भवन येथे गर्दी केली. बिगबी अमिताभ बच्चन यांचा आवाज असल्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी बच्चनवेडे कोल्हापूरी व्हॉटसअप ग्रुपचे सदस्य आवर्जुन उपस्थित होते.
लहान मुलांमध्ये देश-विदेशातील चित्रपट पाहण्याची आवड जोपासावी म्हणून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमार्फत बालचित्रपट दाखविण्यात येतात. या उपक्रमाअंतर्गतच वॉल्ट डिस्नेनिर्मित बीएफजी हा चित्रपट दाखविण्यात आला. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात बडे फरिश्तेजी या पात्राला बिग बी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.
चिल्लर पार्टीच्या या उपक्रमात दरवेळेस सुधाकरनगर झोपडपट्टीतील मुलांचाही सहभाग असतो. याहीवेळेस ही लहान मुले आवर्जुन हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते. मुलांनी चांगली स्वप्नं पहावीत असा संदेश देणाऱ्या या चित्रपटाची कथा एका दैत्याभोवती फिरणार आहे.
अनाथालयात राहणारी सोफिया ही लहान मुलगी अपघाताने या दैत्याच्या सानिध्यात येते आणि त्या दैत्याचे आयुष्यच बदलून जाते. चांगल्या दैत्याबरोबरच माणसांचे वाईट चिंतणारे दैत्यही माणसांना त्रास देत असतात. सोफियाच्या हुशारीमुळे इग्लंडच्या राणीच्या मदतीने बीएफजी या वाईट दैत्याबरोबर कसा लढा देतो, हे या चित्रपटात दाखविले आहे. केवळ लहान मुलांना डोळ्यासमोर स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्यासारख्या महान दिग्दर्शकाचा हा चित्रपट पाहून चिल्लरपार्टीने खूपच मजा लुटली.