कोल्हापूर : कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेमार्फत येथील दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालयाच्या आवारात भरविण्यात आलेल्या एकदिवसीय रानभाज्या रोपनिर्मिती प्रदर्शनास प्रतिसाद मिळाला.निसर्गमित्र ही संस्था गेली सात वर्षे रानभाज्यांच्या संवर्धनासाठी कृतीशील कार्यक्रम आयोजित करत आली आहे. महाराष्ट्रातील विविध स्थळांना भेटी देउन रानभाज्यांच्या बिया संकलन करुन यावर्षी याही रोपांची निर्मिती करण्यात आली आहे.
या रोपांची शेती न करता स्वत:च्या परसबागेत किंवा अंगणात पावसाच्या पाण्यावर चार महिन्यांसाठी खाण्यास योग्य अशा रानभाज्या संवर्धनाची चळवळ लोकापर्र्यत पोहोचविण्यासाठी हे एकदिवसीय रानभाज्या रोपनिर्मिती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात भोकर, चिंच, शमी, पळस, आपटा, कांचन, पिंपळ, उंबर, करंज, कळसंबी, करांदा, पांढराकुडा, पेण, भुई आवळी, करटोली, हादगा, मायाळ, गुळवेल, वाघाटी, गोकर्ण, कांडवेल, पपई, सुरण, फणस, आघाडा, आळू, ओवा, शेवगा, केना, तांदळी, पायपर्णा इत्यादी रानभाज्यांच्या रोपांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे संयोजन, अनिल चौगुले, पराग केमकर, अजय अकोळकर, सागर दळवी, अभय कोटणीस, सुनिल चौगुले, रोहन केमकर, यश चौगुले यांनी केले.
पुढचा टप्पात आजीबाईच्या भेटीला
रानभाज्यांचा शोध घेउन त्यांच्या पाककृती जुन्या पिढीपासून जाणून घेउन नव्या पिढीकडे देण्याचा आणि जैवविविधतेचा संपन्न ठेवा राखण्यासाठीचे प्रयत्न निसर्गमित्रतर्फे करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील अनेक वृध्द स्त्रियांकडे असलेली रानभाज्यांबाबतची माहिती समजून घेण्यासाठी निसर्गमित्रचे प्रतिनिधी या आजीबार्इंची भेट घेणार आहेत, अशी माहिती निसर्गमित्रचे डॉ. मधुकर बाचूळकर यांनी दिली आहे.