कोल्हापूर : कोल्हापुरातील फ्लिट अकॅडमीमार्फत सुरु झालेल्या पंधरा दिवसीय ऑनलाईन चित्रपट रसग्रहण कार्यशाळेच्या पहिल्या खुल्या सत्राला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत मानसशास्त्रीय, कायदेशीर- नैतिक आणि कलात्मक अंगानं १५ विविध चित्रपटांचे रसग्रहण होणार आहे.
पहिल्या सत्रात क्रेमर व्हर्सेस क्रेमर या १९७९ सालच्या चित्रपटाचे विविध मान्यवरांनी रसग्रहण केले. लेखक दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक यांनी कलेच्या अंगाने चित्रपटातील सौंदर्यशोध घेतला तसेच निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखवली, तर मानसशास्त्रतज्ञ डॉ. शिरीष शितोळे यांनी मानसशास्त्रीय अंगाने चित्रपटातील प्रत्येक पात्राची ओळख करुन दिली. ॲड. प्रवीण देशपांडे यांनी या चित्रपटात व त्या अनुषंगाने एकूणच जीवनात कायदा व नीतिमूल्ये कशी काम करतात याचे बारकावे सांगितले. या कार्यशाळेत कोल्हापूरसह राज्यातील मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद ते नागपूरपर्यंतच्या ४२ चित्रपटप्रेमींनी भाग घेतला. कार्यशाळेच्या संयोजिका सुषमा शितोळे यांनी प्रास्ताविक केले.
मानसशास्त्रीय अंगाने पहिलीच कार्यशाळा
या कार्यशाळेत जागतिक पातळीवर दखलपात्र ठरलेल्या १५ वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. मानसशास्त्रीय व कायदा, नीतीमुल्ये आणि कला या तिन्ही अंगाने महाराष्ट्रात अशाप्रकारची ही पहिलीच कार्यशाळा आहे. लेखक दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक यांना ही कल्पना २०१८ मध्ये सुचली होती. अशा पद्धतीच्या कार्यशाळा केवळ पुणे, मुंबई तसेच चित्रपट महोत्सव किंवा त्या त्या चित्रपटविषयक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या कॉलेजमध्येच होतात.
स्टीव्ह ग्रीनफिल्ड यांचे मार्गदर्शन
पंधरा दिवसांची ही कार्यशाळा ११ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत दर शनिवारी आणि रविवारी ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. चित्रपटाची लिंक सहभागी चित्रपटप्रेमींना देण्यात येते. चित्रपट आणि कायदा विषयांच्या पुस्तकांचे लेखक वेस्टमिन्स्टर विद्यापीठाचे प्रोफेसर स्टीव्ह ग्रीनफिल्ड एका सत्रात लंडनहून संवाद साधणार आहेत.