कोल्हापूर : महात्मा गांधीजींच्या जीवनातील महत्वाच्या घटनांबाबत तसेच त्यांच्या विचारांवर वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणाºया आणि महादेवभाई देसाई या महात्मा गांधी यांच्या स्वीय सहायकांच्या जीवनावर आधारित महादेवभाई या नाटकाचे अभिवाचन प्रत्यय या नाट्यसंस्थेमार्फत करण्यात आले.लक्ष्मीपूरीतील श्रमिक सभागृहात झालेल्या या अभिवाचनाला मोजक्याच परंतु दर्दी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर शहर शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रत्यय या कोल्हापुरातील नाट्यसंस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचे अभिवाचन समीर पंडितराव, दिलीप बापट, मिलिंद इनामदार, कृष्णा भूतकर, अभय मणचेकर, रोहित पोतनीस, डॉ. सुहास लकडे, पवन खेबूडकर या रंगकर्मींनी आपल्या ओघवत्या संवादफेकीने केले.
रामू रामनाथन या मूळ लेखकाने हे नाटक लिहिले आहे. त्याचा अनुवाद कोल्हापूरातीलच अनुवादक माया पंडित यांनी केला आहे, तर प्रत्ययचे रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांनी संकलन केले आहे. या अभिवाचनाला सिद्धी मिरजे आणि मंगेश कांबळे यांनी अतिशय प्रभावी असे पार्श्वसंगीत दिले होते. साहील कल्लोळी आणि स्वरुपा फडके यांनी संयोजन सहाय्य केले. एका वेगळ्या कलाकृतीचा अनुभव या अभिवाचनामुळे मिळाला.
या वेळी जेष्ठ रंगकर्मी डॉ.शरद भुताडीया यांना पुण्याच्या अत्रे प्रतिष्ठानकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, प्रा.टी. एस.पाटील यांच्या हस्ते आणि पुरोगामी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीची आजपर्यतची वाटचाल यावर कपील मुळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मार्गदर्शन केले. जेष्ठ नाट्यकर्मी आणि कोल्हापूर शाखेचे सांस्कृतीक कार्यवाह सुनील माने यांनी कोल्हापूरातील नाट्यसंस्थांची समन्वयी आणि पुरोगामी वाटचाल या विषयी माहिती सांगितली. यावेळी त्यांनी अं.नि.स.च्या कामात सर्व नाट्यसंस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
या वेळी रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाच्या सदस्य संजिवनी तडेगावकर, प्राचार्य टी.एस.पाटील, व्यंकप्पा भोसले, शरद नावरे, अनमोल कोठाडीया, अतुल दिघे, तनुजा शिपूरकर, संजय हळदीकर, निहाल शिपुरकर आदी मान्यवर आणि पुरोगामी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन संघसेन जगतकर यांनी केले तर आभार सीमा पाटील यांनी मानले.