कोल्हापूर : यंदा जनजागृतीमुळे शहरासह उपनगरातील गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गौरी गणपती विसर्जनास उदंड प्रतिसाद दिला; त्यामुळे शहराच्या विविध भागांतून ५८ हजार १८१ गणेशमूर्ती महापालिका यंत्रणेकडून संकलित करण्यात आल्या. अर्पण केलेल्या या मूर्तींचे इराणी खणीत फेर विसर्जन करण्यात आले. यासोबतच १५0 टन निर्माल्य जमा झाले असून, त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे.यंदा महापुरामुळे पंचगंगा नदीघाट, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे गणेशमूर्तींचे विसर्जन अत्यल्प झाले. या सोबतीला पावसाची संततधार सुरूच होती. परिणामी पंचगंगेच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ झाली.
या आपत्कालीन स्थितीमुळे घरगुती गौरी गणपती विसर्जन महापालिका व विविध सेवाभावी संस्थांनी पंचगंगा नदी परिसरातील गायकवाड पुतळा चौकात, दसरा चौक, राजाराम बंधारा कसबा बावडा परिसरातील दत्त मंदिराजवळ पर्यायी कुंडामध्ये गणेशमूर्ती अर्पण करण्याची सोय केली होती. त्यास गणेशभक्तांनी मोठा प्रतिसाद दिला.
त्याकरिता महापालिकेने १६ आरोग्य निरीक्षक, २५० आरोग्य विभागाचे कर्मचारी, ड्रेनिजे विभागाचे ३५, पवडी विभागाचे ५०० आणि १०६ ट्रॅक्टर-ट्रॉली, २० डंपर, ८ जे. सी. बी. अशी यंत्रणा तैनात केली होती. या यंत्रणेच्या साहाय्याने गणेशमूर्ती जमा करण्यात आल्या.
विसर्जन ठिकाणी गणेशमूर्ती अर्पण केलेल्या गणेशभक्तांना महापालिकेतर्फे पर्यावरणाचा समतोल राखल्याबद्दल आणि गणेशमूर्ती अर्पण केल्याबद्दल आयुक्तांच्या सहीचे प्रमाणपत्र देण्यात आले; त्यामुळे शनिवारी सकाळपासून ५८ हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे संकलन झाले. पूर परिस्थिती वाढते प्रदूषण याचा विचार करून शहरवासीय गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास मोठा हातभार लावला.संकलित झालेल्या मूर्तींची संख्या अशी :रंकाळा तलाव, संध्यामठ, तांबट कमान, रंकाळा टॉवर, पद्माराजे उद्यान व पतौडी घाट-१२,५२७, पंचगंगा घाट, लक्षतीर्थ व गंगावेस-६,९७४, कळंबा तलाव व जरगनगर-२,८९७, राजाराम बंधारा, नदीघाट, सासने मैदान, महावीर कॉलेज, बापट कॅम्प, रुईकर कॉलनी व विक्रम हायस्कूल-६,८७४, कोटीतीर्थ, नारायण मठ, राजाराम तलाव, सायबर चौक, टाकाळा, महावीर गार्डन, प्रायव्हेट हायस्कूल, विक्रमनगर स्वामी समर्थ मंदिर, दसरा चौक-१५,०००. या सर्व मूर्ती एकत्रित करून इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या, तसेच नागरिकांनी इराणी खण येथे १३,९०९ मूर्ती विसर्जित केल्या असून, एकूण मूर्तींची संख्या ५८,१८१ आहे.