चंदगड तालुका माध्यमिक ऑनलाईन हस्ताक्षर शिक्षक संघ व इंग्लिश टीचर असोसिएशनतर्फे आयोजित हस्ताक्षर कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे त्याचे हस्ताक्षर. जे कधीही क्षर होत नाही. नष्ट होत नाही ते म्हणजे अक्षर. आजच्या संगणकाच्या युगातही सुंदर अक्षराचे महत्त्व तितकेच जास्त टिकून राहिले आहे. सुंदर अक्षर म्हणजे आपल्या सुंदर व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे आणि ही ओळख देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांची अक्षरं घडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते अक्षरमित्र अमित भोरकडे (मंगळवेढा, ता. पंढरपूर) यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध करून टाकले.
अक्षरांपासून जसं सुंदर वाक्य बनतं, अगदी तसच भोरकडे यांनी अक्षरांच्याच माध्यमातून माणूस जोडण्याचं तंत्र सांगितलं. अक्षरश: दोन तास चंदगड तालुक्यातील शिक्षणप्रेमी अक्षर पंढरीत तल्लीन झाले होते. पाहुण्यांचे स्वागत व परिचय सुभाष बेळगांवकर यांनी केले.
शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे यांनी या ऑनलाईन मराठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचे कौतुक केले आणि पंचायत समितीतर्फे शुभेच्छा दिल्या.
लॉकडाऊननंतर लवकरच अमित भोरकडे यांची ऑफलाईन कार्यशाळा भरविण्याचा मनोदय व्यक्त केला. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर. आय. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षराचा वसा घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यशाळेत माजी प्राचार्य ए. एस. पाटील, शिक्षक संघाचे जिल्हा प्रतिनिधी एस. डी. पाटील, मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव शिवणगेकर, प्रा. संजय पाटील, बसवंत चिगरे, अलबादेवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका बागे, फौजी पाटील, निलम पाटील, सुयोग धस, गजानन नांदवडेकर यांनी प्रश्नोत्तरात सहभाग घेतला.
कार्यशाळेस तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पी. एम. ओऊळकर यांनी आभार मानले.