लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या..’च्या जयघोषात आज कसबा बावडा व परिसरातील घरगुती गणपती बाप्पा व गौराईला निरोप देण्यात आला. महापालिका तसेच विविध पर्यावरणपूरक संघटनांनी मूर्तीदानसाठी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे सात हजारहून अधिक मूर्ती दान करण्यात आल्या.
विसर्जनासाठी राजाराम बंधारा व घाट परिसराकडे कोणी फिरकू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. तसेच परिसरात तब्बल २० ठिकाणी विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. त्यामुळे बहुतेक नागरिकांनी जवळ असणाऱ्या कुंडातच मूर्तींचे विसर्जन केले. पाटील गल्लीच्या छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळाने गल्लीतील कुंडात विसर्जित झालेल्या गणेश मूर्ती नंतर ट्रॅक्टरच्या साह्याने एकत्रित संकलित करून महानगरपालिकेकडे सुपूर्त केल्या.
दरम्यान, ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या विसर्जन कुंडामुळे बावड्यातील कोणत्याही रस्त्यावर गर्दी दिसून आली नाही. सर्वत्र शांततेत गणेशाचे विसर्जन झाले. राजाराम बंजारा ग्रुप, बावडा रेस्क्यू फोर्सचे कार्यकर्ते राजाराम बंधारा येथे थांबून मार्गदर्शन करत होते.
सोन्याची चेन परत...
सर्किट हाऊस येथील अपूर्वा पाटील यांनी लाईन बाजार येथील त्यंबोली प्ले कॉर्नर येथे ठेवलेल्या कुंडामध्ये गणेश मूर्ती दान केल्यानंतर मूर्तीवरील एक तोळे सोन्याच्या चेनसह मूर्ती कुंडामध्ये सोडली. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते निवास जाधव, राहुल गावडे, बाजीराव जाधव, विजय जाधव हे मूर्ती बाहेर काढून ठेवत असताना त्यांना चेन दिसताच त्यांनी अपूर्वा पाटील यांना ती परत केली.
फोटो:
१) छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ पाटील गल्लीच्या कार्यकर्त्यांनी गल्लीतील गणेश मूर्ती अशा एकत्रित संकलित करून महापालिकेकडे सुपूर्त केल्या.
२) नेहमी विसर्जनावेळी गजबजून जात असलेला राजाराम बंधारा व घाट परिसर असा आज सुनासुना दिसत होता.
३) दत्त मंदिर येथे विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्ती अशा एकत्रित ठेवण्यात आल्या होत्या.
(सर्व फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )
कसबा बावड्यात गल्लीनुसार गणेशमूर्ती विसर्जनासाठी अशा एकत्रित बाहेर पडल्या.
(फोटो-रमेश पाटील )