लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : निर्माण चौकात सुरू असलेल्या नवऊर्जा उत्सवाला भाविकांचा, पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत लाखो भाविकांनी या उत्सवाला भेट दिली. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्र्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या या नवऊर्जा उत्सवाला शनिवारी खासदार धनंजय महाडिक व अभिनेता चेतन दळवी यांनी भेट दिली.
निर्माण चौकातील या उत्सवास कोल्हापूर शहर, जरगनगर भागातील कै. विठाबाई पाटील विद्यालय, संत रोहिदास विद्यालय, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल, चाटे स्कूल यांसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी भेट दिली. सार्थक ग्रुपच्या सागर बगाडे यांच्यासह त्यांच्या संघाने आदिशक्तीची उत्पत्ती, तिची रूपे आणि ब्रह्मांड स्वरूपाचे दर्शन सुंदर बॅले डान्समधून उपस्थित भाविकांना घडविले. गेल्या दोन दिवसांत या उत्सवस्थळास लाखो भाविकांनी भेट दिली.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, ‘तरुण भारत’चे कार्यकारी संपादक जयसिंग पाटील, अभिनेते चेतन दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, लेखिका सोनाली नवांगुळ आणि वास्तुविशारद गिरिजा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, हा प्रकल्प साकारून पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूरकरांची नस ओळखून साक्षात नवदुर्गांचे एकाच छताखाली दर्शन घडविले आहे. आदिशक्ती अंबाबाईचा महिमा अगाध आहे. त्याचा प्रत्यय देवीची सोन्याची पालखी बनविताना आला.अभिनेता चेतन दळवी म्हणाले, आम्ही आतापर्यंत शूटिंगवरील भव्यदिव्य सेट पाहत होतो. मात्र, असा सेट साक्षात आदिशक्तींचे दर्शन घडवीत आहे, हे पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. कलाकृती पाहून अचंबित झालो. राहुल चिकोडे व ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे अशोक देसाई, अनंत खासबारदार, तुषार देसाई, आदी उपस्थित होते.बॅनर लावाएवढी मोठी कलाकृती सर्वांना पाहण्याची पर्वणी पालकमंत्री दादांनी आम्हांला दिली आहे. त्यांचे एकही बॅनर, होर्डिंग या ठिकाणी नाही, इतका साधेपणा त्यांच्यात आहे. माझी विनंती आहे की, दादांनी त्यांचा बॅनर लावण्यास विरोध करू नये. कार्यकर्त्यांनी तो लावावा, अशी आपल्या भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी मागणी केली.आज, रविवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत कोल्हापुरातील आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेचे कलाकार मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत; तर सायंकाळी सहा वाजता ‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसाची भूमिका केलेल्या सुरभी हांडे याही उपस्थित राहणार आहेत.कोल्हापुरातील निर्माण चौक येथे सुरू असलेल्या ‘नवऊर्जा उत्सवा’मध्ये शनिवारी सायंकाळी भाविकांनी अशी अलोट गर्दी केली.