कोल्हापूर : शाहू स्मारक भवन येथे ‘हलकल्लोळ’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार मंगेश काळे व डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शरावती इंगवले- यादव व युवा चित्रकार विपुल हळदणकर यांच्या कलाकृतींचा चित्रप्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शरावती इंगवले-यादव यांच्या ‘फापटपसारा आणि भंगार’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना भवाळकर म्हणाल्या, ‘या काव्यसंग्रहातून निरूपयोगी विचार डोक्यातून काढून टाकून, आनंदी आयुष्य जगले पाहिजे, याचा दृष्टिकोन मिळतो.
दररोजच्या जगण्यातील, व्यवहारातील दैनंदिनी शब्दबद्ध केली आहे. हलकल्लोळ चित्रप्रदर्शनात कुंचल्याच्या साहाय्याने स्त्रियांच्या आकृतिबंधात मातृशोध घेतला आहे. या चित्रप्रदर्शनातून स्त्री आकृतिबंधाचा भौमितिकपणा सिद्ध केला आहे.हलकल्लोळ चित्रप्रदर्शनात निसर्ग आणि महिलांच्या सौंदर्याचे वर्णन करणारी जवळपास ५० पेक्षा जास्त चित्रे आहेत. हे प्रदर्शन १६ नोव्हेंबरपर्यंत खुले राहणार आहे. यावेळी मंजुश्री गोखले, सुजाता पेंडसे, अजय दळवी, श्रीराम पचिंदे्र, विजय टिपुगडे, बाळासाहेब पाटील, अशोक इंगवले, आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील ज्येष्ठ चित्रकार शरावती इंगवले-यादव आणि युवा कलाकार विपुल हळदणकर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंगेश काळे, सुजाता पेंडसे, मंजुश्री गोखले उपस्थित होत्या.