चंदगड/प्रतिनिधी : (नंदकुमार ढेरे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सात महिने चंदगड आगारातून बंद असलेली बससेवा जोमाने सुरू आहे. प्रवाशांनीही आता मास्क, सॅनिटायझरचा वापर करत बसमधून प्रवास करण्याला प्राधान्य दिल्याने चंदगड आगाराला दररोज सरासरी अडीच लाखांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आगारप्रमुख गौतम गाडवे यांनी दिली.
चंदगड आगारामार्फत प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई १, पुणे ४, निगडी १, सातारा १, सांगली १, कोल्हापूर २२, बेळगाव ३६ या फेऱ्यांसह तालुकांतर्गत विविध बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. मागील २०, २५ दिवसांपासून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे अद्याप शाळा, कॉलेज नियमित सुरू झाले नसल्याने विद्यार्थी वर्गाचा प्रवास थांबला असल्याने मोजक्या प्रवाशांना घेऊन बस वाहतूक सुरू आहे. दरम्यान, प्रवाशांच्या घटलेल्या संख्येमुळे महामंडळाने उत्पन्नाचा पर्यायी मार्ग म्हणून दहा टनापर्यंतची माल वाहतूक (वस्तू , साहित्य) ३८ रुपये किलोमीटर दराने सुरू केली आहे. तसेच रिटन असल्यास ३६ रुपये दराने वाहतुकीची सोय उपलब्ध केली आहे. कोल्हापूर-कोदाळी बसदेखील सुरू केली आहे, तर इसापूर बस सुरू करण्याची मागणी होत असली तरी येथील रस्ता खचला असल्याने बांधकाम विभागाकडून वाहतुकीसंदर्भातील पत्र प्राप्त झाल्याखेरीज इसापूर बसफेरी सुरू करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
चौकट:-- वडापने काढले डोके वर
चंदगड, बेळगाव, हलकर्णी फाटा ते बेळगाव असे वडाप सुरू असून वडाप चालक चंदगड-बेळगाव बसच्या पुढे आपली गाडी पळवतात, तसेच बेळगावहून रात्री आठ वाजता सुटणाऱ्या गाडीच्या पुढे वडाप गाड्या सुटत असल्याने चार, दोन प्रवासी घेऊन रिकामी बस आणावी लागत आहे. याचा तोटा चंदगड आगाराला सहन करावा लागत आहे. याबाबत पोलीस व आरटीओकडे तक्रार करणार असल्याचे आगारप्रमुख गौतम गाडवे यांनी सांगितले.