कोल्हापूर : साई-निर्मल क्रिएशन या बॅनरची निर्मिती असलेल्या ‘सोपस्कार’ या कोल्हापूरच्या मातीत तयार झालेल्या आणि कोल्हापूरचे कलाकार असलेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.हा चित्रपट गेल्या १२ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव जिल्ह्यात प्रदर्शित झाला. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलींचे शिक्षण, त्यांचे करिअर आणि अजूनही त्यांच्या लग्नाबाबत घेतले जाणारे चुकीचे निर्णय या समाजातील वास्तवावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.हा सामाजिक चित्रपट ९0 टक्के कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला आहे. कोल्हापूरच्या एका कुटुंबवत्सल महिलेने धाडस करत बनविलेला हा स्त्रीप्रधान चित्रपट भावस्पर्शी, सामाजिक आशय मांडतो.कोल्हापुरातील नवोदित कलाकारांना खऱ्या अर्थाने न्याय देत कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या आणि मूळ संस्कृती जपणाऱ्या या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरणही कोल्हापूर परिसरातच, विशेषत: गडमुडशिंगी गावात पूर्ण करण्यात आले आहे. उत्तम लोकेशन्स, उत्तम चित्रीकरण, बहारदार संगीत विशेष म्हणजे तांत्रिकदृष्ट्या सफाईदार हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथील जवळपास ९0 चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मराठीच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर झळकलेला हा एकमेव स्थानिक चित्रपट म्हणता येईल.दिग्दर्शक, निर्मात्या, कथा-पटकथा-संवाद, गीते अशी अष्टपैलू जबाबदारी कोल्हापूरच्याच कविता विक्रमसिंह पाटील यांनी साभाळली आहे. आदर्श शिंदे यांनी या चित्रपटातील दमदार गाणी गायली आहेत.
तेजस चव्हाण यांचे संगीत, संग्राम भालकर यांचे नृत्य, बी. महेंतेश्वर यांचे संकलन, बाबा लाड यांचे छायांकन आहे. चित्रपटात सुमेधा दातार यांची प्रमुख भूमिका असून, धनंजय पाटील, धनंजय पोलादे, प्रिया पाटील अमोल चव्हाण, मंजित माने, अभिषेक पाटील, प्रफुल्ल पाटील, सोनाली पाटील या स्थानिक कलाकारांच्या भूमिका आहेत.