माजी मंत्री कल्लाप्पा आवाडे व त्यांचे सुपुत्र आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये जात असल्याबद्दल विचालेल्या प्रश्नाला पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, आवाडे पितापुत्र गेली पन्नास वर्षे काँग्रेसच्या विचारधारेत काम करत आहेत. ते काँग्रेससोबत राहावेत ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात राहावे, असे आवाहन आम्ही त्यांना केले होते. परंतु आवाडे यांनी अद्याप कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. जर काही ते वेगळा विचार करणार असतील, तर त्यांना परत काँग्रेसमध्ये आणण्याची जबाबादारी पी. एन. पाटील यांची आहे.
जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हे जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेससोबत राहावेत यासाठी आमचे प्रयत्न असून, त्यांच्याशी माझे लवकरच बोलणे होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी सांगितले की, ही निवडणुक महाविकास आघाडीतील घटक पक्ष ताकदीने लढवतील. जेथे जेथे शक्य आहे, तेथे एकत्र जावा, असे सांगितले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना त्याचे अधिकार दिले आहेत.
-कामे करणारा उमेदवार हाच निकष -
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व्हे करून उमेदवार निश्चित केले जातील, लोकांची कामे करणारा उमेदवार हाच निकष राहील. इच्छुकांना समोर बोलावून दोन दाेन तास चर्चा करून उमेदवारी दिली जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
शिरोलीकरांना टोला -
कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीवर त्यांनी बरेच राजकारण केले. वास्तविक पाण्यासारख्या प्रश्नात राजकारण करायची आवश्यकता नव्हती. तरीही त्यांनी राजकारण केले. गावच्या पाणी योजनेचे काम ज्यांना करता आले नाही, त्यांनी बावड्यावर बोलू नये, असा टोला पालकमंत्री पाटील यांनी शिरोलीकरांना हाणला.