कोल्हापूर : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ऊस दराच्या आंदोलनात आम्ही खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत असल्याचे जवाहर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी समारंभात जाहीरपणे सांगितल्याने यंदाच्या पहिल्या उचलीचा तिढा तेच सोडविणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवाडे यांनी पहिली उचल जाहीर केल्यास इतर कारखान्यांनाही त्याप्रमाणे उचल द्यावी लागेल. आवाडे ती ३१०० की ३२०० रुपये जाहीर करतात हीच उत्सुकता आहे.
आवाडे व शेट्टी यांच्यात अलीकडच्या काही दिवसांत चांगला संवाद निर्माण झाला आहे शिवाय थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीतच त्यांनी आम्ही शेट्टीसोबत असल्याचे जाहीर केल्याने आवाडे यांनी पहिल्या उचलीचा काही प्रस्ताव दिल्यास तो शेट्टी यांनाही नाकारता येणार नाही, तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रविवारपर्यंत या प्रश्नांतून काही तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेट्टी यांनी पहिली उचल विनाकपात ३४०० रुपये देण्याची मागणी केली आहे. ती जाहीर करतानाच त्यांनी दोन पावले मागे येण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आवाडे यांनी उचल जाहीर केल्यास संघटनेची त्यास संमती असू शकते. ऊस दराच्या आंदोलनात शेट्टी यांची सरकारकडून जेव्हा-जेव्हा कोंडी केली गेली तेव्हा साखर कारखानदारच आंदोलनाची कोंडी फोडण्यात पुढे आले आहेत. यंदाही सरकारने एफआरपीएवढीच पहिली उचल देणार असल्याचे गुरुवारीच सहकारमंत्र्यांनी जाहीर केले आहे. ऊस दराचे श्रेय शेट्टी यांना मिळू नये असाच भाजप सरकारचा प्रयत्न आहे. त्यास आवाडे यांच्या भूमिकेमुळे शह बसणार आहे. यापूर्वी हुतात्मा कारखान्याचे नेते वैभव नायकवडी एकदा, दोनवेळा आवाडे, एकदा दिवंगत नेते सा. रे. पाटील व दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी अशीच पहिली उचल जाहीर करून आंदोलनाची कोंडी फोडली आहे.
शेट्टी व कल्लाप्पाण्णा आवाडे हे गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्याविरोधात निवडणूक लढले आहेत; परंतु त्यानंतर या दोन नेत्यांत सलोखा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आघाडी केली होती. मध्यंतरी प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये जाणार होते; परंतु त्यांना इचलकरंजीतून विरोध सुरू झाल्यावर शेट्टी यांनीच आवाडे यांना भाजपमध्ये जावू नका, आपण दोघे मिळून दबाव गटाचे राजकारण करू, असे सांगून राजकीय आधार दिला. त्यानुसार आवाडे यांनी भाजपचा नाद सोडला. शेट्टी यांनी पहिल्या उचलीबाबत घेतलेली भूमिका योग्य असल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितलेच शिवाय महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही एफआरपीवर हटून बसू नका, असा सल्ला दिला. त्यामुळे आवाडे दोन दिवसांत पहिली उचल जाहीर करण्याची शक्यता आहे. ते नक्की किती रुपयांचा आकडा फोडतात याबद्दलच उत्सुकता आहे. त्यांनी एकदा उचल जाहीर केली की अन्य कारखान्यांच्याही उचलीचे आकडे जाहीर होतील.पालकमंत्र्यांची अडचणपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आवाडे यांनी पुढाकार घेऊन या प्रश्नांत काही निर्णय घडवून आणल्यास त्यास सरकार म्हणून आम्ही ‘मम’ म्हणायला तयार असल्याचे जाहीर केले आहे; परंतु पालकमंत्र्यांना या प्रश्नांत थेट पुढाकार घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सरकार म्हणून आम्ही एफआरपीशी बांधील असल्याचे व त्यावर एक रुपया जास्त देणार नसल्याचे गुरु वारीच जाहीर केले आहे. एकदा सरकारची ही भूमिका असताना पालकमंत्र्यांनी कोल्हापुरात एफआरपीपेक्षा जास्त उचलीबाबत समेट घडवून आणल्यास त्यातून सरकारचीच दुटप्पी भूमिका दिसेल तसे होऊ नये याकरिता पालकमंत्री पाटील हे या घडामोडींपासून बाजूला राहिले आहेत.