कोल्हापूर : जागतिक दर्जाची विद्यापीठे आपल्याकडे येत आहेत. ओघाने स्पर्धात्मक स्वरूपात वाढ होणार आहे. त्याअनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर येत आहे. बृहत् आराखडा शैक्षणिक विकासाच्या वाटचालीचा आरसा असतो. निश्चितपणे हे लक्ष्य आराखड्यामध्ये प्रतिबिंबित झाले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ यांच्याकरिता शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीचा पंचवार्षिक बृहत् आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी, पुढील पाच वर्षांकरिता विद्यापीठाच्या विकासाचा दृष्टिकोन कसा असावा, याचे विस्तृत मार्गदर्शन विद्यापीठाचे माजी कुलगुरू व महाराष्ट्र शासन नियुक्त बृहत् आराखडा समिती सदस्य डॉ. एन. जे. पवार यांनी केले. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. बी. एन. जगताप, प्राचार्य अनिल राव, डॉ. मिलिंद सोहानी, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह शिवाजी विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठातील अधिकारी आदींची उपस्थिती होती.सर्वसमावेशक भूमिकेद्वारे आराखडा तयारकुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, बृहत् आराखडा सर्वसमावेशक होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने जिल्हानिहाय समिती निर्माण केल्या आहेत. यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक, लोकप्रतिनिधी, जिल्हा उद्योग प्रतिनिधी, अधिकार मंडळांचे सदस्य या सर्वांची समावेशक भूमिका घेऊन हा आराखडा तयार केला आहे.