समीर देशपांडेकोल्हापूर : काँग्रेसचे बहुतांशी नेते मनातून हरले असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी पक्षाने सतेज पाटील यांच्यावर सोपविली आहे. केवळ माझा मतदारसंघ, माझे पै-पाहुणे, माझेच कार्यकर्ते, माझ्याच संस्था आणि जिथे-तिथे मीच आणि माझ्या घरातलेच अशी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना बाजीला करत पुन्हा एकदा नवी सुरुवात करण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे. देशभर निर्माण झालेल्या भाजपच्या वादळात पाटील कसा दिवा लावणार आहेत, यावर जिल्ह्यातील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे.शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका, राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवून मिळविलेला विजय, त्यासाठी भाजप-शिवसेनेचे घेतलेले सहकार्य. दुसºयावेळी काँग्रेसची उमेदवारी घेत विजयी होऊन गृहराज्यमंत्रिपद अशी कामगिरी सतेज पाटील यांच्या नावावर आहे.मात्र, सन २०१४ च्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलली. गेली दहा वर्षे सतेज पाटील यांनी प्रत्येक तालुक्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. प्रत्येक तालुक्यात आपला स्वतंत्र गट करत त्यांनी बळ वाढविले. विधानसभेचा वचपा काढत त्यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करत विधानपरिषदेत बाजी मारली.हे सर्व करत असताना त्यांनी कधीच स्वत :ला एका तालुक्यापुरते बांधून घेतले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असले तरी जिल्हाभर वावर सतेज यांचा राहिला. नगरपंचायतीपासून ते ‘गोकुळ’पर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी अनेकांना बळ देण्याचा प्रयत्न केला. अशातच प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यरत असताना खुद्द त्यांनीच केवळ आठ महिन्यात पक्षाचाच राजीनामा दिला आणि काँग्रेस मुळापासून हादरली.त्यामुळे ही जिल्हाध्यक्षपदाची माळ सतेज यांच्या गळ्यात पडली. प्रत्येक पक्षीय किंवा स्वत:च्या कार्यक्रमांचे नेटके नियोजन, त्यासाठीची आवश्यक यंत्रणा राबविण्याची हिंमत यामुळे काँग्रेसला सतेज यांच्याशिवाय समर्थ पर्यायही नव्हता.
तालुका-तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र करणे, प्रत्येकाच्या विविध संस्था, जिल्हा बँक, गोकुळ यातील राजकारणामुळे फाटाफूट झाल्याने अशांना किमान पक्षीय निवडणुकांसाठी एका जाजमावर आणणे हे फार मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.काँग्रेसपासून दूर निघालेल्या युवापिढीला तेवढ्याच ताकदीने त्यांनासोबत घ्यावे लागेल तसेच भाजप-शिवसेनेतही दुखावलेले अनेकजण आहेत. त्यांनाही पाटील हात घालण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे आता ‘पदरचं खाऊन काँग्रेससाठी’काम करणाºया नेते, कार्यकर्त्यांची फळी जी गेल्या अनेक वर्षांत लुप्त झाली ती पुन्हा निर्माण करावी लागेल तरच जिल्ह्यात ‘हात’ टिकण्याची शक्यता आहे.कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा नेतासत्तेत असो किंवा नसो; ‘कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा नेता’ अशी त्यांची ओळख आहे म्हणून सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेतानाही त्यांचे कार्यकर्ते बिनधास्तपणे त्यांची भूमिका पुढे नेताना दिसत आहेत. निवडणुकीतील अवगत असलेले तंत्र, ‘अरे’ला ‘कारे’ म्हणण्याची तयारी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी असलेला स्नेह, सातत्यपूर्ण संपर्क या जोरावर त्यांनी आपले हे स्थान निर्माण केले आहे ते पाटील यांना उपयुक्त ठरणार आहे.