कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ विकसित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासंदर्भात आपण स्वत: सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना करतो. या बैठकीला मी स्वत:देखील उपस्थित राहीन, अशी स्पष्ट ग्वाही राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिष्टमंडळास दिली.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांची महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी सायंकाळी भेट घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळ विकासासंदर्भात निवेदन दिले. शहरातील टाऊन हॉलशेजारील नर्सरी बागेत शाहू महाराज यांची समाधी बांधली जात असून, महानगरपालिकेने आतापर्यंत दोन कोटी ८७ लाख रुपये खर्च केले आहेत. यापुढील कामास सहा कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. मात्र, राज्य सरकार अथवा जिल्हा नियोजनमधून या कामास निधी उपलब्ध करून दिलेला नाही. तेव्हा आपण याबाबत मार्गदर्शन करावे, तसेच निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती महापौर मोरे, उपमहापौर शेटे यांनी केली.
चौथरा, मेघडंबरी, परिसर सुशोभीकरण, आदी कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय यापुढे समाधिस्थळ परिसरातील सांस्कृतिक हॉल विकसित करणे, उद्यान विकसित करणे ही कामे व्हायची बाकी आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता निधीअभावी ही कामे रेंगाळली जाऊ नयेत, अशी आमची रास्त अपेक्षा असल्याचे महापौर मोरे व उपमहापौर शेटे यांनी सांगितले. शिष्टमंडळात माजी महापौर हसिना फरास, आर. के. पोवार, आदिल फरास, राजेश लाटकर, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, आदी उपस्थित होते.निरोप सोमवारीच देतोशरद पवार म्हणाले, ‘शाहू समाधिस्थळ विकसित करणे हे राज्य सरकारचेच काम आहे. सोमवारी मी प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो. निधी कसा द्यायचा यासंदर्भात एक बैठक घेण्यास सांगतो. तारीख ठरली की तुम्हाला सोमवारीच निरोप देतो. या बैठकीला मी स्वत:ही उपस्थित राहीन. महापालिकेचे चार लोक बैठकीला या.’