गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला १४, तर ताराराणी आघाडीला १९ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजप सत्तेत होता. आता सत्तेत नसताना संघर्ष करावा लागणार आहे. धनंजय महाडिक भाजपमध्ये आल्यामुळे ताराराणी आघाडीऐवजी सर्व जागा भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा प्रस्ताव पुढे आला होता, परंतु कोल्हापूर शहराची राजकीय ठेवण आणि काही प्रभागांमध्ये भाजपऐवजी ताराराणी आघाडीला पसंती मिळण्याची शक्यता असल्याने अखेर हा प्रस्ताव बारगळला आहे. त्यामुळे भाजप आणि ताराराणी आघाडी एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे.
भाजप राज्यात सत्तेत असताना चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे मंत्री होते. त्यामुळे त्यांनी या माध्यमातून कोल्हापूरच्या सुशोभीकरणापासून ते सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत शहर विकासासाठी जी कामे केली, पर्यटन वाढीसाठी जे पूरक प्रयत्न केले याची मांडणी नागरिकांसमोर करण्यात येणार आहे. त्यासाठीचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी शहरातील विविध तालमी, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांना जी मदत केली त्या सर्वांना आता भाजपच्या पाठीशी राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनाने घेतलेले निर्णय, देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील निर्णय याचे दाखले देत महापालिका ताब्यात द्या, असे मतदारांना आवाहन करण्याचे नियोजन आहे.
चौकट
मातब्बर उतरणार प्रचारात
भाजप प्रथेप्रमाणे या निवडणुकीत केंद्र आणि राज्य स्तरावरील मातब्बरांना प्रचारामध्ये उतरवणार आहे. जनमानसावर ज्यांचा प्रभाव आहे अशा दिल्लीपासून अन्य राज्यांतील नेतेही या प्रचारामध्ये उतरवले जातील, अशी चिन्हे आहेत. तसेच सांगली, सातारा, रत्नागिरी, कोकण आणि बेळगावमधील नेते आणि कार्यकर्त्यांवरही विशेष जबाबदारी दिली जाणार आहे.
चौकट
संभाजीराजेंनाही घ्यावी लागणार भूमिका
राष्ट्रपती कोट्यातून खासदार झालेले संभाजीराजे छत्रपती यांना खासदार करण्याचा निर्णय भाजपनेच घेतला. त्यामुळे संभाजीराजेंनी त्यांच्याच शहरातील निवडणूक लागल्यानंतर थेट भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपचे पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनाही थेट भूमिका घ्यावी लागण्याची चिन्हे आहेत.
चौकट
कोरे, आवाडेंनाही सक्रिय करण्याचा निर्णय
माजी मंत्री विनय कोरे यांनी राष्ट्रवादीसोबत महापालिकेची सत्ता हस्तगत करून ‘जनसुराज्य’चा महापौर करून दाखवला होता. कोरे आता आमदार आहेत आणि भाजपसोबत आहेत. आमदार प्रकाश आवाडे हे देखील सध्या भाजपशी जवळीक साधून आहेत. या दोन्ही नेत्यांनी ठरवल्यास कोल्हापूर शहरामध्ये आपापल्या संस्थांच्या माध्यमातून ते भाजपला मदत करू शकतात. त्यामुळे त्यांनाही भाजप आपल्यासाेबत घेण्यासाठी प्रयत्नात आहे.