लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील सामानगडावरील विश्रामगृह आणि राधानगरी तालुक्यातील ओळवण, दाजीपूर येथील धर्मशाळा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. तसेच चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ४ कोटी १८ लाख रुपयांची निविदाही मंजूर करण्यात आली.
सप्टेबर २०१६ मध्ये सामानगडावरील विश्रामगृह आणि ओळवण, दाजीपूर येथील धर्मशाळा भाड्याने देण्याबाबत ई लिलाव जाहीर करण्यात आला हाेता. मात्र, या ई लिलावाला प्रतिसाद मिळाला नव्हता. मध्यंतरी काही सामाजिक संस्थांनी या इमारतींची सामाजिक कार्यासाठी मागणी केली होती. मात्र, अशा पध्दतीने संस्थेला इमारत देण्याऐवजी वैयक्तिक मक्तेदाराच्या नावावर भाडेतत्त्वावर दिल्यास जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातही भर पडेल आणि इमारतीवरील जिल्हा परिषदेचे अधिकार, हक्कही अबाधित राहतील असा मुद्दा पुढे आला. ओळवण येथे १२३ चौरस मीटरची धर्मशाळा आहे. ती भाडेतत्त्वावर देण्याबाबत राधानगरी पंचायत समितीनेही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. ११ डिसेंबर २०२० च्या बांधकाम समितीनेही याबाबत शिफारस केली आहे. त्यानुसार या दोन्ही इमारती भाडेतत्त्वावर देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
चौकट
गडहिंग्लज येथे सार्वजनिक क्रीडा संकुल
गडहिंग्लज येथे क्रीडा संकुलासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु जागेअभावी काम झाले नाही. आता एम. आर. हायस्कूलची शेती शाळेला दिलेली जागा विनावापर असल्याने ती उपलब्ध झाली आहे. ही जागा क्रीडा संकुलासाठी मिळण्याकामी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे करण्याचा विषय या सभेत मंजूर करण्यात आला.
चौकट
सिरसंगी येथे आरोग्य उपकेंद्र
आजरा तालुक्यातील सिरसंगी येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी ८४ लाख ४७ लाख रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला या सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आजरा महागाव रस्त्यावर असलेल्या सिरसंगी येथे आता ही उपकेंद्राची इमारत बांधण्यात येणार आहे.