कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे प्रवाशांसाठी विश्रांतीगृह सुरू करण्यात आले आहे. मुंबई, पुणे येथील स्थानकावरील सुविधेच्या धर्तीवर याठिकाणी विश्रांतीगृहाची सुविधा करण्यात आली. येत्या आठवड्याभरात पूर्ण क्षमतेने ही सुविधा उपलब्ध होईल.
कोल्हापूरला लांब पल्ल्याच्या आठ रेल्वे रोज ये-जा करतात. आठवड्यातून एकदा धनबाद, अहमदाबाद आणि निजामुद्दीन एक्स्प्रेस, तर दोनवेळा नागपूरसाठीची एक्स्प्रेस येते. या रेल्वेतून देशभरातील अंबाबाईचे भाविक आणि पर्यटक येतात. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकावर दोन मजली विश्रांतीगृह सुरू केले आहे. त्यात २४ जणांसाठीची विश्रांती घेण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. विश्रांतीगृहात लहान-लहान कक्ष तयार केले आहेत. त्यात प्रवाशांना त्यांच्या प्रवासी बॅगा ठेवता येतात. विश्रांतीसाठी पलंग आहेत. स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. सुविधेचा बारा तास लाभ घेण्यासाठी ९० रुपये, तर चोवीस तासांसाठी १५० रुपये इतके शुल्क आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेतील प्रवाशांनाच केवळ ही सुविधा मिळणार आहे.लवकरच आॅनलाईन नोंदणीची व्यवस्थादेशभरातून येणारे भाविक अंबाबाईचे दर्शन घेऊन लगेच कोल्हापूरमधून निघून जातात. यातील काहीजण एकटे येतात. अशावेळी त्यांना काही तासापुरते आपल्याजवळील प्रवासी बॅगा ठेवण्याच्या सुविधेसह काही तासांच्या विश्रांतीची गरज असते.
मात्र त्यांना जादा पैसे मोजावे लागतात. त्यांना अल्पदरात विश्रांती घेण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून रेल्वे प्रशासनाने विश्रांतीगृह सुरू केले असल्याचे कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक ए. आय. फर्नांडिस यांनी सांगितले.ते म्हणाले, या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गरम पाणी, स्वच्छता, आदींबाबतची कामे करून येत्या आठवड्याभरात हे विश्रांतीगृह पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल. लवकरच या सुविधेसाठी आॅनलाईन नोंदणीची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.असा घ्या सुविधेचा लाभतिकिटाचे आरक्षण केलेल्या आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेतील प्रवाशांना या विश्रांतीगृहाच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.त्यासाठी प्रवाशांनी स्थानकावरील ‘टी.सी.’ कार्यालयात तिकीट दाखवून बारा अथवा चोवीस तासांसाठीचे पैसे भरून या सुविधेसाठीची पावती घ्यावयाची आहे.
कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे प्रवाशांसाठी विश्रांतीगृह सुरू करण्यात आले आहे. ही सुविधा मुंबई, पुण्यातील सुविधेच्या धर्तीवर करण्यात आली आहे.