राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी पुकारलेल्या संचारबंदीला मुरगूड शहरातील नागरिकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. यावर ‘लोकमत’मध्ये ‘संचारबंदीचा फज्जा’ अशा आशयाची बातमी प्रकाशित झाल्यानंतर शनिवारी दिवसभर पोलीस आणि पालिका प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली. सपोनि विकास बडवे यांनी सकाळी आठपासून एस. टी. स्टँडच्या परिसरात १० कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली होती. यावेळी शेकडो जणांवर कारवाईचा बडगा उगारला. अनेक मोटारसायकली जप्त केल्या.
निपाणी-राधानगर रस्त्यावर कुमार ढेरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली होती. पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. याबरोबरच शहरात सध्या १२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्या रुग्णाच्या परिसरात पालिकेने बॅरिकेट लावून प्रतिबंधित क्षेत्र असा फलक लावला आहे. अचानक बॅरिकेड आणि फलक पाहून नागरिक गोंधळात पडले होते.
फोटो ओळ
मुरगूड एस. टी. स्टँडवर पोलिसांनी नाकाबंदी करीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली.
१७ मुरगूड पोलिस