कोल्हापूर : नाताळ आणि नववर्षामुळे उत्साह व पार्ट्यांचे सर्वत्र वातावरण असले तरी राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज शनिवारी दुपारी २ वाजता आदेश लागू केले. जिल्ह्यात सध्या ओमायक्रॉन रुग्ण आढळला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने हे नियम लागू केले आहेत.राज्यात ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या १०८ वर गेल्याने खबरदारी म्हणून राज्य सरकारने काल, शुक्रवारी रात्री नवे निर्बंध लागू केले. त्यानुसार, रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आली आहे. यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. मात्र नव्या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटने डोके वर काढले. या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत आहे. जिल्ह्यात याचे संशयित रुग्ण आढळून आले होते. मात्र सुदैवाने या रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र प्रशासनाने पुढील धोका टळावा यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात आज पासून असणार हे निर्बंध
- रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना बंदी असणार
- लग्न समारंभासाठी सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर असू नये. खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी तितकी असेल.
- क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
- उपाहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या ठिकाणी असणारी क्षमता पहिली जाहीर करावी लागणार.
- नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन आधिनियम २००५, व साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार