कोल्हापूर : हाय रिझोल्युशन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) द्वारे कोविड निदान करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काही बंधने घातली आहेत. जरी एचआरसीटीद्वारे निदान पॉझिटिव्ह आले तरी संबंधित रुग्णाची २४ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणी करणे आणि तिची माहितीही स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक करण्यात आले आहे.केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या मार्गदर्शनानुसार आरटीपीसीआर व ॲन्टीजेन चाचणी सकारात्मक आली तरच तो रुग्ण कोविड १९ चा समजून त्यावर उपचार करण्याच्या सूचना आहेत. तरीही काही खासगी रुग्णालये एचआरसीटी ही चाचणी कोविड निदानासाठी वापरत आहेत आणि या चाचणीच्या आधारे रुग्णांवर कोविडचे उपचार करीत आहेत.
एचआरसीटी चाचणीत कोविडसदृश बाबी दिसल्यामुळे चुकीचे निदान होऊन रुग्णास आवश्यक नसताना कोविड-१९ चे उपचार दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणूनच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी बुधवारी नवीन अधिसूचना जारी केली.एचआरसीटीद्वारे कोविड १९ चे निदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता, इत्यादी माहिती संबंधित निदान केंद्रांनी स्थानिक प्रशासनास द्यावी. प्रत्येक नगरपालिका व महानगरपालिका त्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करील.
रुग्णाचा एचआरसीटी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास २४ तासांत त्याची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. जर ही चाचणीही पॉझिटिव्ह आली तर राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड १९ साथ नियंत्रणासाठी निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी करणे तसेच लक्षणांनुसार अलगीकरण, विलगीकरण व उपचार करावेत, अशी बंधने या अधिसूचनेद्वारे घालण्यात आली आहेत.कोविड साथीचा गैरफायदा घेत काही खासगी रुग्णालये आरटीपीसीआर चाचणीऐवजी एचआरसीटी चाचणी करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे रुग्णांची फसवणूक तर होतेच; शिवाय अशा रुग्णांमुळे नेमकी माहिती प्रशासनास मिळत नसल्याने साथ वाढण्याचा धोका आहे. आरोग्य विभागाच्या अधिसूचनेमुळे त्याला आता चाप बसेल.