दत्ता बीडकर --हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून १९५२ ते ६७ पर्यंत एक सर्वसाधारण आणि दुसरा अनु. जाती (राखीव) असे दोन आमदार विधानसभेवर पाठविले जात होते. १९६७च्या पुनर्रचनेत वडगाव (राखीव) मतदारसंघ तयार झाला. या पुनर्रचनेत शिरोळ तालुक्यातील आठ गावांचा समावेश वडगावमध्ये झाला. याचा फायदा नेहमी काँग्रेस पक्षाला झाला. पुन्हा २००९ ला हा मतदारसंघ तालुक्याच्या नावाने पुनर्रचित झाला. हातकणंगले (राखीव) मतदारसंघ तयार होत असताना शिरोळ तालुक्यातील आठ गावे वगळून इचलकरंजी मतदारसंघातील १३ गावांचा समावेश झाला. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा जनसुराज्य आणि शिवसेनेने उठविला.हातकणंगले तालुक्यामध्ये १९५२ला विधानसभा १ आणि २ असे दोन मतदारसंघ होते. सर्वसाधारण गटातून बाबासाहेब खंजिरे, तर राखीव गटातून दत्तात्रय शामराव पवार हे काँग्रेस पक्षाचे आमदार विजयी झाले. १९५७ला मात्र सरकार विरोधी लाटेत या मतदारसंघातून कॉ. संतराम पाटील आणि शेकापचे दादासाहेब शिर्के निवडून आले. १९६२च्या निवडणुकीत तालुक्यात रत्नाप्पाण्णा कुंभार गटाचा उदय झाला आणि या मतदारसंघात मिणचे गावचे मातंग गुरुजी अर्थात केशव नरसिंह घाटगे काँग्रेस पक्षाचे आमदार झाले. १९६७ला वडगाव विधानसभेचा मतदारसंघ पुनर्रचित झाला. यामध्ये शिरोळ तालुक्यातील दानोळी, कोथळी, निमशिरगाव, कवठेसार, तमदलगे, चिप्री, जैनापूर, उमळवाड या आठ गावांचा समावेश झाला. रत्नाप्पाण्णा कुंभार यांना मानणारी आणि पंचगंगा कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या आठ गावांमुळे १९६७ ला या मतदारसंघात चुरस निर्माण झाली. काँग्रेसकडून केशव घाटगे (मातंग गुरुजी) यांना पेठवडगावच्या यादव घराण्याने मोठे आव्हान निर्माण केले. यावेळी दलित कुटुंबातील दत्तकपुत्राचा वाद चांगलाच गाजला. १९८० च्या मध्यावधी निवडणुकीपासून १९९९च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सलग पाचवेळा काँग्रेसच्या जयवंतराव आवळे यांनी या वडगाव (राखीव) मतदारसंघाचे नेतृत्व केले. २००४च्या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे यांच्या नवख्या जनसुराज्य पक्षाचे राजीव आवळे यांनी वारणा पट्ट्याच्या एकगठ्ठा मतावर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा पराभव करत जनसुराज्यचा झेंडा फडकविला. जनसुराज्य पक्षाला लोकनेते खा. बाळासाहेब माने, कल्लाप्पाण्णा आवाडे आणि महादेवराव महाडिक गटाचा छुपा पाठिंबा मिळाला होता. प्रथमच मतदारसंघात काँग्रेसअंतर्गत धुसफुसीचे राजकारण झाले. समाजकल्याण मंत्रिपदावर असतानाही जयवंतराव आवळेंचा पराभव झाला.२००९च्या निवडणुकीत पुन्हा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. शिरोळ तालुक्यातील आठ गावे वगळण्यात आली, तर इचलकरंजी मतदारसंघातील माणगाव, माणगाववाडी, साजणी, तिळवणी, रुई, पट्टणकोडोली, इंगळी, हुपरी, तळदंगे, रेंदाळ, रांगोळी आणि जंगमवाडी अशी १३ गावे जोडून हातकणंगले (राखीव) मतदारसंघ तयार झाला. शिरोळ तालुक्यातील आठ गावांतील ४२,४०० मते कमी झाली, तर १३ गावांतील ८० ते ८५ हजार मते वाढली. या मतदासंघात १३ गावे इचलकरंजी शहरालगतची असल्यामुळे प्रकाश आवाडे गटाला मानणारे जैन, लिंगायत आणि बहुजन मतदार मोठ्या संख्येने होते. जयवंतराव आवळे लातूरचे खासदार असल्यामुळे त्यांनी आपले पुत्र राजू आवळे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. जनसुराज्यने राजीव आवळे यांना पुन्हा रिंगणात उतरविले. ‘स्वाभिमानी’ने दत्ता घाटगेंना उभे केले. कुरघोडीमुळे आवाडे गटाने जनसुराज्यला मदत केली. मिरज दंगलीचा फायदा घेत प्रथमच (राखीव) मतदारसंघात शिवसेनेने सुजित मिणचेकर यांना विजयी करत भगवा फडकविला. हातकणंगले-राजकीयभूगोल
पुनर्रचनेत वगळलेल्या गावांचा प्रस्थापितांना झटका
By admin | Published: September 26, 2014 12:17 AM