कोल्हापूर : कोल्हापुरात तूर, मसूर, उडीद, चणा या डाळींच्या साठ्यावर घाऊक, किरकोळ व्यापारी तसेच मिलर्सना साठा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
केंद्र शासनाने याबाबत १९ जुलै रोजी अधिसूचना काढली आहे. यानुसार घाऊक व्यापारी जास्तीत जास्त ५०० मेट्रिक टन धान्याचा साठा करू शकतात. मात्र त्यात एकाच प्रकारच्या डाळीचा साठा २०० मेट्रिक टनापेक्षा जास्त असू नये, ही अट घालण्यात आली आहे. किरकोळ व्यापारी ५ मेट्रिक टन, तर मिलर्स गेल्या ६ महिन्यांतील असलेले उत्पादन किंवा वार्षिक क्षमतेच्या ५० टक्के यामध्ये जे जास्त असेल ती कमाल साठा मर्यादा असेल. ज्या कायदेशीर घटकांकडे या डाळींचा साठा अधिसूचनेतील साठा निर्बंधापेक्षा जास्त आहे, त्याबाबतची माहिती Fcainfoweb.nic.in या उपभोक्ता मामले विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. अतिरिक्त् डाळींचा साठा केंद्र अधिसूचनेपासून ३० दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक राहील. हे आदेश डाळींच्या आयातदारांना लागू असणार नाहीत. मात्र त्यांना आपल्याकडील साठ्याची माहिती fcainfoweb.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक आहे. या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पुरवठा विभागाने दिला आहे.
----