कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाच्या निर्बधांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. त्यासाठी आज, बुधवारपासून जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या प्रमुख आठ मार्गांवर पोलीस बंदोबस्तासह जिल्हा प्रशासनाचे ॲंटिजन तपासणीसाठी पथक कार्यान्वित असेल. जिल्हात प्रवेशणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. ग्रामीण भागात ग्रामसमित्या, प्रशासनातील दोन अधिकारी, पोलीस यांची गस्त पथके तयार करून निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार, त्यासाठी काही गावावरही विशेष लक्ष ठेवणार असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत ते उपाययोजनांसाठी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या ही अटोक्यात आहे. येत्या पंधरा दिवसांत नागरिकांनीच निर्बंध पाळले तर हा कोरोनाचा आलेख पूर्णपणे कमी येईल.
जिल्ह्याबाहेरील प्रादुर्भाव होणार नाही याचीही दक्षता घेतली आहे. त्यासाठी आज, बुधवारपासून जिल्ह्यात प्रवेशणारे अंकली नाका, किणी नाका, कोगनोळी, शिरोळी (ता. चंदगड), गवसे (आजरा), गगणबावडा, आंबा, राधानगरी या आठ मार्गांवर कडक पोलीस बंदोबस्त तसेच प्रवेशणाऱ्यांची जाग्यावरच ॲंटिजन तपासणी होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाचे पथक सक्रिय असेल.करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यांवर लक्षकरवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, शिरोळ हे चार तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. दहापेक्षा जास्त रुग्ण असलेल्या रेडझोन गावात पोलिसांची नाकाबंदी वाढविण्यात येत आहे. तेथील ग्रामसमित्या पुन्हा कार्यान्वित करून पोलीस बंदोबस्तात वाढ तसेच गटविकास अधिकारी, तहसीलदार या दोन अधिकाऱ्यांसोबत गस्त वाढवून कडक निर्बंधांची अंमलबजावणी होणार आहे.