लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यूथ डेव्हलपमेंट को-ऑप. बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केल्याने निर्बंध उठणार आहेत. रिझर्व्ह बँकेची तपासणी झाली असून, येत्या पंधरा दिवसांत व्यवहार सुरू करण्याचे आदेश येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात बँकेने १५ कोटींचे थकीत कर्ज वसूल करत असताना ७ कोटींचा नफा कमावला आहे.
थकीत कर्जापोटी ५ जानेवारी २०१९ रोजी यूथ बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्यानंतर नैसर्गिक संकटांचा सामना करत वसुलीची मोहीम राबवली. त्यामुळे सात कोटचा नफा झाला असून, मार्च २०२१ पर्यंत तो दहा कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेची तपासणी पूर्ण झाली आहे. निर्बंधाचा कालावधी ५ जानेवारी २०२१ पर्यंत असला, तरी रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीचे पृथकरण ५ जानेवारीपर्यंत पूर्णत्वास येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मुदतवाढ मिळण्याची शक्यता असली, तरी २५ जानेवारीपर्यंत निर्बंध शिथिल होऊन बँक पूर्ववत सुरू होऊ शकते.
दृष्टिक्षेपात बँक-
ठेवी - ७५.२६ कोटी
गुंतवणूक - ६९.०८ कोटी
कर्जे - १४ कोटी
भागभांडवल - ६.५१ कोटी
निधी - १८ कोटी
नफा - ७ कोटी
सीआरएआर -१६ टक्के
नेटवर्थ - ३.३५ कोटी
कोट -
रिझर्व्ह बँकेचे निर्बंध उठून पुन्हा बँक सुरू होणारी यूथ बँक बहुधा पहिली असून, यासाठी रिझर्व्ह बँकेसह सहकार विभागाने सहकार्य केले. बँकेचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, तज्ज्ञ संचालक चेतन नरके यांच्या प्रयत्नांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठबळ दिल्याने हे शक्य झाले.
- आर. पी. पाटील (अध्यक्ष, यूथ बँक)