कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून शिवाजी विद्यापीठातील ६२ कर्मचारी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार काम करत आहेत. विद्यापीठात आवश्यकतेपेक्षा कमी कर्मचाऱ्यांवर येथे कामकाज सुरू आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मचारी जिल्हा प्रशासन घेत असल्याने विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.विद्यापीठ प्रशासन आणि अधिविभागासाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची एकूण ७०४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ४५२ पदे कार्यरत असून २११ पदे रिक्त आहेत. दरमहा कर्मचारी निवृत्त होत असल्याने रिक्तपदांची संख्या वाढत आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी येथील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडून दिली जात असल्याने विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होत आहे.
प्रशासनातील विविध बिले अदा करणे अथवा विद्यार्थ्यांसाठी संबंधित असलेल्या पीएच.डी.सह विविध अभ्यासक्रमांचे निकाल लावणे, आदींना विलंब होत आहे. नियमित कर्मचारी निवडणूक विषयक कामांसाठी जात असल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांसह उर्वरीत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे.
जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंतीविद्यापीठात सध्या आवश्यकतेपेक्षा मनुष्यबळ कमी आहे. विद्यापीठातील कामकाज सुरळीतपणे चालण्याबाबतचा विचार करून येथील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात यावे, अशी आम्ही जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने आमच्याकडून कर्मचाऱ्यांची माहिती घेतल्याचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सांगितले.