कोल्हापूर : उच्च शिक्षणाची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. या निकालात यावर्षी कोल्हापूर विभागाचा टक्का घसरला आहे. एकूण ८७.१२ टक्क्यांसह हा विभाग राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.
या विभागात ८८.१५ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्हा प्रथम, सांगली जिल्हा ८६.५५ टक्क्यांनी द्वितीय, तर सातारा जिल्हा ८६.२६ तृतीय क्रमांकावर आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण हे मुलांपेक्षा १३.७५ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभागाने ९१ टक्के निकालासह राज्यात द्वितीय क्रमांक कायम राखण्याची हॅटट्रीक साधली होती. अवघ्या पाँईट ४० टक्क्यांनी विभागाचा निकाल घटला होता. मात्र, यावर्षी राज्यात पाचव्या क्रमांकावर कोल्हापूर विभाग पोहोचला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी विभागाच्या निकालाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी विभागातून ७९८ कनिष्ठ महाविद्यालयांतून १२५४३३ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १०९२७९ जण उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८७.१२ टक्के आहे. त्यात ७३९०५ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५८६७१ मुले उत्तीर्ण झाली असून त्याचे प्रमाण ७९.३९ टक्के इतके आहे. ५५१८६ मुलींनी परीक्षा दिली असून त्यातील ५१४०१ उत्तीर्ण झाल्या असून त्याचे प्रमाण ९३.१४ टक्के आहे.
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १३.७५ टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी तुलनेत यावर्षी कोल्हापूर विभागाच्या निकालात ३.८८ टक्क्यांनी घट झाली आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील २९४ महाविद्यालयातील ५१७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ४५५८८ जण उत्तीर्ण झाले.
- सांगली जिल्ह्यातील २६३ महाविद्यालयांतील ३५५१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३०७४० जण उत्तीर्ण झाले.
- सातारा जिल्ह्यातील २४१ महाविद्यालयांमधील ३८१९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील ३२९५१ जण उत्तीर्ण झाले. पुनर्परीक्षार्थींचा निकाल २१.६७ टक्के लागला असून त्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ९.७७ टक्क्यांनी घट झाली आहे.
या पत्रकार परिषदेस विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव टी. एल. मोळे, शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार, राजेश क्षीरसागर, एन. बी. पवार, लेखाधिकारी एस. एल. रेणके, बी. आर. स्वामी, बी. डी. आंबी, व्ही. पी. पाटील, आदी उपस्थित होते.