कोल्हापूर : सोडतीवर आक्षेप घेतल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकरवी सुनावणी पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाचा आज अंतिम निकाल होणार आहे. पन्हाळ्यातील उंड्री ग्रामपंचायतीचा निकाल शुक्रवारी दिला आहे. आता राहिलेल्या शाहूवाडी, करवीर, शिरोळ, भुदरगड, गडहिंग्लज या पाच तालुक्यांतील आठ गावांचा निर्णय आज झाल्यानंतर सरपंच पदाच्या स्थगित झालेल्या २७५ गावांचा प्रश्नही निकाली निघणार आहे.
सरपंच पदाच्या सोडत पध्दतीवर आक्षेप घेत करवीर तालुक्यातील कोगे व खुपिरे, पन्हाळ्यातील उंड्री, शिरोळमधील शिरटी व तमदलगे, भुदरगडमधील फणसवाडी व मजरेवाडी, शाहूवाडी, गिरगाव, गडहिंग्लजमधील तळेवाडी या गावांंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिका दाखल केलेले वरील सहा तालुक्यांतील सरपंच निवड प्रक्रिया १६ फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली. हे करताना १६ पूर्वी सुनावणी घेऊन प्रश्न निकाली काढा, असेही सुचित केले. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या दालनात सुनावणी घेऊन संबंधित तक्रारदार गावातील दोन्ही बाजूचे सदस्य, ग्रामस्थ, वकील, याचिकाकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. सुनावणीची प्रक्रिया गुरुवारी संपली, तरीही उंड्री वगळता उर्वरित ८ गावांचा निकाल जिल्हाधिकारी बाहेर असल्याने राखून ठेवण्यात आला.
आज सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीचा अंतिम निकाल देण्यात येणार आहे. उंड्रीचा निकाल जैसे थे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या उर्वरित गावांचे काय होते, याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. आरक्षण जैसे थे राहिले, तर लगेच सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आरक्षणात बदल झाला, तर संपूर्ण तालुक्याच्या आरक्षणात बदल होऊन गावनिहाय फेरआरक्षण टाकावे लागणार आहे. या सर्व जर तरच्या शक्यतांमुळे सहा तालुक्यांतील २७५ गावचे सरपंच गॅसवर आहेत. या सर्वांचे डोळे आज होणाऱ्या निकालाकडे लागले आहेत.